या तारखेला छोट्या पडद्यावर रंगणार 'धडक'चा प्रिमिअर !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:07 AM2018-09-26T11:07:53+5:302018-09-26T11:11:03+5:30
पार्थवी (जान्हवी कपूर) आणि मधु (ईशान खट्टर) हे एकाच कॉलेजमध्ये असून त्यांचे तरूण प्रेम उदयपुरच्या सुंदर पार्श्वभूमीवर फुलत जाते. तो एका छोट्याशा हॉटेल मालकाचा मुलगा असतो तर ती स्थानिक राजकारण्याची मुलगी असते.
दोन वेगळी व्यक्तिमत्त्वे असलेल्या दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय होतं? ‘दो दिल, एक धडक’च्या ह्या कथेने समाजाच्या बुरसटलेल्या विचारांचे शक्ले मोडली. ‘धडक’ ही एक साधी पण उत्कट अशा पहिल्या प्रेमाची कथा आहे. होम ऑफ ब्लॉकबस्टर्स झी सिनेमावर रविवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता धडक चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर आहे. शशांक खेतान दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटात ईशान खट्टर आणि नवतारका जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असून आशुतोष राणा, अंकित बिश्त, श्रीधर वत्सर यांच्या सहभूमिका आहेत. ‘धडक’ ही एक प्रेमकथा असून यात निरागस हृदये कशी विचार करत नाहीत, विचार करून पावले उचलत नाही, ती फक्त धडधडतात हे पाहायला मिळते. यात वास्तविकता असून आपल्या समाजात खोलवर रूजलेल्या पूर्वग्रहांकडेही एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते.
करण जोहरचा धडक हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘सैराट’वरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांचा मूळ गाभा सारखाच असला तरी करण जोहर धडकच्या माध्यमातून आपल्या पद्धतीने ही कथा सांगतो. ‘सैराट’च्या संगीताने प्रेक्षकांच्या मनावर जशी जादूच केली होती. ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांनी ‘धडक’साठीही संगीत दिग्दर्शन सांभाळले असून धडकचे संगीत म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. नवोदित कलाकारांच्या चित्रपटासाठी धडकला मिळालेले पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस ओपनिंग सर्वाधिक आहे. ह्या चित्रपटाने याबाबतीत करणच्याच आधीच्या हिट चित्रपट ‘स्टुडंट ऑफ दि यर’लाही मागे टाकले. उत्फुल्ल व्यक्तिमत्त्व, असाधारण नृत्य कौशल्य आणि एखाद्या सरावलेल्या अभिनेत्याप्रमाणे उत्तम आत्मविश्वासासह केलेले संतुलित प्रदर्शन यांसह ईशान ह्या चित्रपटाचा चमचमता सितारा आहे. नाट्यमय दृश्यांमधील त्याचा अचूकपणा आणि त्याच्या डोळ्याची निरागसता ह्या प्रेमकथेला अगदी जीवंत राखते. जान्हवी आपल्या सुंदर आणि आकर्षक रूपाने प्रेक्षकांना मोहित करते. श्रीधर वत्सरने ईशानचा खास मित्र साकारला असून तो धम्माल करतो. राजकारणी आणि कडक शिस्तीच्या वडिलांच्या रूपात आशुतोष राणा अगदी चपखल बसतात.
धडकच्या वर्ल्ड टीव्ही प्रीमिअरच्या निमित्ताने जान्हवी कपूर म्हणाली, “ह्या चित्रपटाचे चित्रीकरण करताना आणि जेव्हा तो प्रदर्शित झाला तेव्हासुद्धा मला खूप सकारात्मक ऊर्जा लाभली. हा चित्रपट माझ्यासाठी जणू एक व्यक्तिगत प्रवास होता आणि तो मला सर्वांसोबत वाटायचा होता. हा माझा पहिलाच चित्रपट होता, त्यामुळे पार्थवीची व्यक्तिरेखा म्हणून कसे वाटते हेच मी शिकले नाही तर भूमिका पडद्यावर सर्वोत्तम प्रकारे कशी साकारायची याबद्दलही काही क्लृप्त्या शिकले. ‘धडक’ हा चित्रपट कायमच माझ्या हृदयाच्या जवळ राहिल आणि यातील प्रत्येक क्षण अन् क्षण दीर्घ काळ माझ्या स्मरणात राहिल.”
मधुची भूमिका करणार ईशान खट्टर म्हणाला, “ह्या चित्रपटाने माझे आयुष्यच बदलले आणि माझी भेट काही खास लोकांशी घडवून आणली. मला चांगले चित्रपट करायचे असून धडक एक अतिशय उत्तम चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचा प्रीमिअर आता झी सिनेमावर होत असून, ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट आधी पाहता आला नाही, त्यांना हा पाहून कसे वाटते ते जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”
पार्थवी (जान्हवी कपूर) आणि मधु (ईशान खट्टर) हे एकाच कॉलेजमध्ये असून त्यांचे तरूण प्रेम उदयपुरच्या सुंदर पार्श्वभूमीवर फुलत जाते. तो एका छोट्याशा हॉटेल मालकाचा मुलगा असतो तर ती स्थानिक राजकारण्याची मुलगी असते. ते एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या खोड्या काढतात आणि पिछोला तलावाच्या काठावर गुजगोष्टी करतात. पण जेव्हा त्यांच्या परिवाराला कळते तेव्हा हे स्वप्न उध्वस्त होते आणि भेदक वास्तव त्यांच्यासमोर येते. हे दोघे अनेक अडथळ्यांना मागे टाकून नवीन शहरामध्ये एक नवीन आयुष्य जगण्यासाठी पळून जातात.
उदयपुरमध्ये त्यांच्या प्रेमाला कशाचीच पर्वा नसते, पण पुढे मुंबई आणि मग कोलकाता येथे त्यांना स्वतःचे पोट भरण्यासाठी मेहनत करावी लागते आणि मग त्यांना कळते की एकत्रपणा हा नेहमीच आनंद घेऊन येतोच असे नाही. काय ह्या प्रेमकथेचा शेवट आनंदी होईल? हे या सिनेमाच्या माध्यमातून उलगडणार आहे.