मराठीत काम करायला आवडेल - मनीषा कोईराला

By सुवर्णा जैन | Published: September 6, 2019 09:41 AM2019-09-06T09:41:59+5:302019-09-06T09:43:22+5:30

मनीषाचा प्रस्थानम हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. याच निमित्ताने आमच्या मनीषाशी साधलेला हा दिलखुलास संवाद..

Would love to work in Marathi Says Manisha Koirala | मराठीत काम करायला आवडेल - मनीषा कोईराला

मराठीत काम करायला आवडेल - मनीषा कोईराला

googlenewsNext

सुवर्णा जैन


मराठी चित्रपटांबद्दल खूप ऐकलंय, संधी मिळाल्यास काम करायला नक्की आवडेल अशी प्रतिक्रिया अभिनेत्री मनीषा कोईराला हिनं दिली आहे. मनीषाचा प्रस्थानम हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. याच निमित्ताने आमच्या मनीषाशी साधलेला हा दिलखुलास संवाद..


१. प्रस्थानम चित्रपटात काम करण्याचा आणि संजय दत्तसह कामाचा अनुभव कसा होता ?


अनुभव खरंच खूप चांगला होता. जेव्हा संजूबाबा आणि मान्यता यांनी चित्रपटासाठी फोन केला तेव्हा मी खूप खूश झाले. चित्रपटाला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. ज्या कुटुंबाशी गेल्या ३० वर्षांपासूनचा परिचय आहे, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. 


२. प्रस्थानम चित्रपटातील भूमिका निवडण्यामागे काही निकष होते का ? 


प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असते. जीवनात कुठल्याही गोष्टीचे नियम नसतात. दरवेळी निकष वेगवेगळे असतात. इथे तर मैत्रीचा विषय होता आणि त्यामुळेच हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी बदलतात. त्यानुसार चित्रपट करण्याआधी निर्णय घ्यावे लागतात. 

३. चित्रपटात तू इतके वर्षे काम करत आहेस. मात्र आता सध्या वेबसिरीजचा जमाना आहे. तुला आवडेल का त्यात काम करायला ?


गेल्या २ ते ३ वर्षात मला वेबसिरीज ऑफर करण्यात येत आहेत. मात्र त्यावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. नेटफ्लिक्सवरील एक चित्रपट नुकताच पूर्ण केला आहे. एक नवीन दिग्दर्शक, एक नवी भूमिका जी मी आजवर कधीही केली नव्हती. त्यामुळं हा एक खूप चांगला अनुभव होता. 

४. एक थोडा वेगळा प्रश्न, जर तू एक दिवसाची पंतप्रधान झाली तर देशातील कोणती गोष्ट तुला बदलायला आवडेल ?


माझ्याकडे किंवा कुणाकडेही जादूची छडी नाही की जी फिरवल्यानंतर लगेच सगळ्या गोष्टी लगेच बदलतील. माझा त्यावर विश्वास नाही. गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकत नाही. कायमस्वरुपी बदलासाठी फटाफट बदल होणं आपल्याला परवडणारं नाही. त्या समस्येवर तात्पुरता कृत्रिम तोडगा काढण्याऐवजी नैसर्गिकरित्या बदल व्हायला हवेत असं मला वाटतं. त्यासाठी १० वर्षेसुद्धा लागू शकतात. मला शक्य झालं तर गरीबी दूर करायला मला आवडेल. मात्र हे बोलणं सोपं आहे, करणं तितकंच अवघड आहे. खरं तर मानसिकता बदलणं गरजेचं आहे..


४. प्रस्थानमचा लूक रसिकांना आवडतोय. त्याबद्दल काय सांगशील ? लूकबाबत तू काही ठरवून प्रयोग करते का?

चित्रपटातील माझा लूक रसिकांना भावतोय हे ऐकून खूप छान वाटतं. स्टायलिश डिझायनरमुळे हा लूक हटके वाटतो आहे. दरवेळी मी लूकबाबत काही ना काही प्रयोग करत असते. त्यामुळे कुणाला तरी कॉपीचा प्रश्नच नसतो. जर एखादी व्यक्तीरेखा साकारायची असेल तर संबधित व्यक्तीबाबतच्या विविध गोष्टी मला माहित असणं गरजेचं आहे असं वाटतं. 


५. अभिनयासोबतच तुला कोणत्या गोष्टी आवडतात ? 


मला खरं बोलायचं तर बऱ्याच गोष्टी आवडतात. मला चित्रपट पाहायला आवडतात. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं मला आवडतं. समुद्रकिनारे, पर्वतरांगा मला भावतात. 


६. मराठी चित्रपट तू किती फॉलो करते ? मराठीत काम करायला आवडेल का?


मी मराठी चित्रपट पाहिलेले नाहीत. मात्र मराठीमध्ये खूप चांगले चांगले चित्रपट बनत असल्याचे मी ऐकलंय. मराठीत एखादी चांगली संधी मिळाली तर मला नक्कीच मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. मी दाक्षिणात्य चित्रपटात काम केलंय, त्यामुळे मराठीतही नक्कीच करायला आवडेल.

Web Title: Would love to work in Marathi Says Manisha Koirala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.