यामी गौतमने दिला गोंडस मुलाला जन्म, सुंदर फोटो शेअर करत सांगितलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:07 PM2024-05-20T12:07:56+5:302024-05-20T12:08:35+5:30
यामीच्या मुलाचं नाव आणि त्याचा अर्थ नेमका काय?
अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam) घरी पाळणा हलला आहे. अक्षय तृतियेलाच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नुकतंच यामी आणि पती आदित्य धरने इन्स्टाग्राम पोस्ट करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. दोघांनीही लेकाचं नावही अतिशय खास ठेवलं आहे. 'वेदविद्' (Vedavid) असं त्याचं नाव आहे जो मूळ संस्कृत शब्द आहे. या पोस्टमध्ये त्यांनी डॉक्टरांचेही आभार मानलेत.
यामी गौतम आणि निर्माता, दिग्दर्शक आदित्य धर आईबाबा झाले आहेत. यामीने अक्षय तृतियेला म्हणजे १० मे रोजी मुंबईतच मुलाला जन्म दिला. लेकाच्या जन्मानंतर 10 दिवसांनी दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गुडन्यूज दिली. त्यांनी श्रीकृष्णाच्या कडेवर छोटं बाळ असल्याचा एक सुंदर फोटो शेअर केला. बाळाचं नाव 'वेदविद्' असल्याचं त्यांनी फोटोवर लिहिलं आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'डॉक्टरांच्या टीमचे खूप खूप आभार ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. मुलाच्या उज्वल भविष्यासाठी पालक म्हणून आमचा नवीन प्रवास सुरु झाला आहे. तो भविष्यात जे काही करेल ते आमच्या कुटुंबाला आणि देशालाही अभिमान वाटावं असं असेल ही आशा आम्ही व्यक्त करतो.'
यामीने मुलाला दिलेलं नाव खूपच वेगळं आणि खास आहे. 'वेदविद्' हा मूळ संस्कृत शब्द आहे. वेदांमध्ये पारंगत असलेला असा त्याचा अर्थ आहे. यामी आणि आदित्य दोघांची त्यांच्या मूळाशी नाळ जोडलेली आहे. दोघंही अत्यंत धार्मिक आहेत. आदित्यच्या सिनेमांमधूनही त्याची धार्मिकता दिसते. त्यामुळे त्यांच्या मुलाचं नावही अगदी तसंच आहे. यामी आणि आदित्यला चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही खूप खूप शुभेच्छा दिल्यात. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.