कृष्णा अभिषेक-गोविंदाचा वर्षानुवर्षे जुना वाद मिटला? दोघांचा डान्स व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 02:40 PM2023-10-29T14:40:33+5:302023-10-29T14:41:50+5:30
कृष्णा अभिषेक आणि त्याचा सुपरस्टार मामा गोविंदा यांच्यातील संबंध सुधारताना दिसत आहेत.
प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेता कृष्णा अभिषेक आणि त्याचा सुपरस्टार मामा गोविंदा यांच्यातील भांडण जगजाहीर आहे. कृष्णा अनेकदा त्याच्या कौटुंबिक कलहामुळे चर्चेत असतो. आता दोघांमधील संबंध सुधारताना दिसत आहेत. याबाबत खुद्द कृष्णाने सोशल मीडियावर हिंट दिली आहे.
कृष्णा अभिषेकने आपल्या मामासोबत केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा एक थ्रोबॅक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये ते दोघे 'छोटे मियाँ-बडे मियाँ' या हिट गाण्यावर शानदार डान्स करताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये कृष्णाने लिहिले, 'यापेक्षा चांगला दुसरा व्हिडीओ असू शकत नाही. मामा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहेत...खऱ्या आयुष्यातील बडे मियाँ, छोटे मियाँ'
गोविंदा आणि कृष्णा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांना टार्गेट करताना दिसले. मीडियारिपोर्टनुसार, गोविंदा हा त्यांच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कृष्णाच्या शोमध्ये जाण्याऐवजी कपिलच्या शोमध्ये गेला होता. तर 2018 मध्ये कृष्णाच्या पत्नीनं म्हणजेच कश्मीरानं एक कमेंट केली होती. ती म्हणाली होती की, लोक पैशांसाठी नाचत असतात. ही कमेंट तिनं गोविंदासाठी केली, असं गोविंदाची पत्नी सुनिता यांना वाटलं होतं. तेव्हापासूनचं गोविंदा आणि कृष्णा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, अशी चर्चा सुरु होती.
मात्र, कृष्णाने मतभेद दूर करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला असून माफीही मागितली आहे. आपल्या विधानांचा अनेकदा विपर्यास केल्याचं त्यानं म्हटलं होतं. मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये कृष्णानं गोविंदाची माफी मागितली होती. त्यानंतर गोविंदानं देखील याचं पॉडकास्टमध्ये हजेरी लावून कृष्णाला माफ केल्याबद्दल सांगितलं होतं. आता कृष्णाच्या ताज्या पोस्टवरून असे दिसते की कुटुंबात सर्व काही ठीक होत आहे.