प्रसिद्धी, पैसा अन् Controversy... हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 05:31 PM2024-12-10T17:31:13+5:302024-12-10T17:31:48+5:30
'यो यो हनी सिंग फेमस' या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Yo Yo Honey Singh: Famous : यो यो हनी सिंग हे नाव तुम्ही आतापर्यंत फक्त गाण्यांमध्येच ऐकले असेल, पण आता या रॅपरच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी 'यो यो हनी सिंग फेमस' ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 'देसी कलाकार' त्याची कहाणी घेऊन आला आहे. या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये हनी सिंगच्या आयुष्याची एक झलक पाहायला मिळतेय.
ट्रेलरमध्ये हनीचे आई-वडीलही त्यांच्या संघर्षाची कहाणी मांडताना दिसत आहेत. तसेच अभिनेता सलमान खानही रॅपरचे कौतुक करताना दिसतोय. खिडकी नसलेल्या घरात २४ वर्षे घालवलेल्या दिल्लीतील एका सामान्य मुलगा ते एक लोकप्रिय रॅपर आणि त्यानंतर आलेलं आजारपण आणि मग केलेला जबरदस्त कमबॅक असा त्याचा संपुर्ण प्रवास डॉक्युमेंटरीमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अनेक सिक्रेट उलगडणार आहेत.
डॉक्युमेंटरीचं दिग्दर्शन मोझेस सिंग यांनी केलं आहे. तर ऑस्कर पुरस्कारविजेत्या निर्माता गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसद्वारे 'यो यो हनी सिंग : फेमस'ची निर्मिती करण्यात आली आहे. हनी सिंगच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर भाष्य करणारी ही डॉक्युमेंटरी येत्या 20 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
एक काळ होता जेव्हा हनीच्या गाण्यावर अवघी तरुणाई थिरकत होती. आपली गाण्याच्या हटके स्टाइल आणि स्वॅगमुळे हनी सिंगनं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अफाट लोकप्रियता तर मिळालीच, याशिवाय ऐश्वर्यही मिळालं. मात्र हे यश त्याच्या डोक्यात गेलं. मग तो क्षण आला, जेव्हा त्याने त्याच्या चुकीमुळे सर्वस्व गमावलं. पण, आजारपणातून बरं झाल्यानंतर हनी सिंह पुन्हा कामाला लागला आणि जबरदस्त कमबॅक केलंय. आता चाहते त्यांची ही डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.