झायरा वसीमच्या बॉलिवूड एक्झिटबाबत तिच्या मॅनेजरने केला हा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 08:00 PM2019-07-01T20:00:00+5:302019-07-01T20:00:02+5:30
झायराची ही पोस्ट पाहून आता उलटसुलट चर्चांना ऊत आले आहे.
अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहून तिने हा निर्णय जाहिर केला होता.‘ बॉलिवूडमध्ये माझी प्रगती होत असली, तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं तिने म्हटले आहे. पण ही पोस्ट झायराने शेअर केल्यानंतर तिचे मॅनेजर तुहीनने काही वेगळीच स्टोरी सांगितली होती. ‘झायराचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहेत. ही पोस्ट तिने लिहिलेली नाही,’ असे या मॅनेजरने म्हटले होते. याऊलट आज तक या वाहिनीशी बोलताना, मी स्वत: ही पोस्ट लिहिल्याचे झायराने स्पष्ट केले होते.
झायराची ही पोस्ट पाहून आता उलटसुलट चर्चांना ऊत आले आहे. झायराने हा निर्णय घेताना धर्माचा दाखला दिल्याने तर तिच्या बॉलिवूडमधील एक्झिटची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण त्याचसोबत झायरानेच ही पोस्ट लिहिली आहे की तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे अकाऊंट हॅक झाले आहे याबाबत चर्चा सुरू आहे. झायराने ही पोस्ट केली नसल्याचे तिच्या मॅनेजरचे म्हणणे होते. पण आता त्यानेच झायराचे अकाऊंट हॅक झाले नसून ही पोस्ट स्वतः तिनेच केली असल्याचा दावा केला आहे.
झायराचे सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक झाले नसून ही पोस्ट तिने स्वतःच केली आहे अशी माहिती झायराचे मॅनेजर तुहीन मिश्रा यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. ‘झायराच्या निर्णयावर किंवा तिने केलेल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? आपल्या इच्छेनुसार जगण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. तिने जो काही निर्णय घेतला आहे त्याने ती आनंदी असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,’असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते.
Who are any of us to question @ZairaWasimmm’s choices? It’s her life to do with as she pleases. All I will do is wish her well & hope that what ever she does makes her happy.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 30, 2019
तर दुसरीकडे झायराचा बॉलिवूड सोडण्याचा निर्णय अनेकांना दुखावणारा ठरला आहे. काही लोकांनी याला योग्य ठरवले आहे तर काहींनी यावर टीकाही केली आहे. झायरा धर्माच्या मार्गावर गेली, असे काहींनी म्हटले आहे. बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्यने हे सगळे झायराचे नाटक असल्याचे म्हटले आहे.