यादों की बारात या चित्रपटासाठी झीनत अमान यांची अशाप्रकारे झाली होती निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 06:00 AM2019-06-08T06:00:00+5:302019-06-08T06:00:02+5:30
सुपर डान्सर या कार्यक्रमात झीनत अमान यांना प्रसिद्ध निर्माते नासिर हुसैन यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली हे देखील त्या सांगणार आहेत.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो.
येत्या आठवड्यात या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू आणि झीनत अमान हजेरी लावणार आहेत. त्या स्पर्धक आणि परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर यांच्यासोबत मौज मस्ती करताना दिसणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान झीनत अमान यांनी देव आनंद आणि राज कपूर यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच बॉलिवूडमधील त्यांच्या प्रवासाविषयी सांगितले.
सुपर डान्सरमधील स्पर्धक या भागात ऐंशी-नव्वदच्या दशकातील गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करणार असून आपल्या परफॉर्मन्समधून प्रेक्षकांचे मन जिंकणार आहेत. या कार्यक्रमात झीनत अमान यांना प्रसिद्ध निर्माते नासिर हुसैन यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली हे देखील त्या सांगणार आहेत. त्यांनी गप्पा मारत असताना सांगितले की, “नासिरजींनी एका हॉटेलमध्ये मला नारळाचे पाणी पीत असताना बघितले होते आणि त्यांनी ‘यादों की बारात’ चित्रपटातील भूमिकेसाठी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना माझे व्यक्तिमत्व आणि माझी राहणी आवडली आणि ते प्रभावित झाले. ते त्यांच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटासाठी कलाकारांच्या शोधात होते. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि चित्रपटात काम करण्याबद्दल विचारले. मी लगेच त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला, त्यानंतर जेव्हा त्यांना कळले की मी याआधी ‘हरे राम हरे कृष्ण’, ‘इश्क-इश्क’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटांत काम केले आहे तेव्हा त्यांना खात्री पटली की, मी या चित्रपटातील भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन.”
सुपर डान्सर हा कार्यक्रम आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे चांगल्या डान्सरला मत देऊन त्याला ‘डान्स का कल’ हा किताब जिंकण्यात मदत करण्याची जबाबदारी आता प्रेक्षकांवर आली आहे. प्रेक्षक सोनीलिव्ह अॅप डाऊनलोड करून आपल्या आवडत्या स्पर्धकाला सुपर 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी मत देऊ शकतात.