हृतिक-कतरिनाच्या जाहिरातीवर चौफेर टीका, ‘झोमॅटो’नं दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 04:16 PM2021-08-31T16:16:52+5:302021-08-31T16:18:46+5:30
काय आहे नेमकी भानगड, वाचा...
झोमॅटो (Zomato) या फूड डिलिव्हरी क्षेत्रातली दिग्गज कंपनीची नवी जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकत्याच झोमॅटोनं आपल्या दोन नव्या जाहिराती रिलीज केल्या. पण हृतिक रोशन (Hrithik Roshan) व कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्यावर चित्रीत या जाहिरातींवर सध्या जबरदस्त टीका होतेय. एकीकडे मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्सला जाहिरातीसाठी साईन करून झोमॅटो प्रसिद्धीवर पाण्यासारखा पैसा खर्च करते, दुसरीकडे डिलिव्हरी बॉईजचे शोषण करते, अशी टीका या जाहिरातीच्या निमित्तानं होत आहे. आता या आरोपावर झोमॅटोनं स्पष्टीकरण दिले आहे.
Ordered samosa on @zomato and… koi mil gaya 😄😄#Adpic.twitter.com/NnLny7W7gM
— Hrithik Roshan (@iHrithik) August 26, 2021
झोमॅटो म्हणते,
आमच्या जाहिराती योग्य संदेश देत आहेत, हा विश्वास आहे. पण काहींनी या जाहिरातींचा चुकीचा अर्थ काढला आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे आम्ही या जाहिरातींमागचा आमचा दृष्टिकोन काय होता, हे सांगू इच्छितो. सध्या सोशल मीडियावर या डिलिव्हरी बॉईजच्या समस्यांची चर्चा सुरू आहे; मात्र आमच्या जाहिरातीची संकल्पना सहा महिन्यांपूर्वी मांडली गेली आणि दोन महिन्यांपूर्वी जाहिरातींचं शूटिंग झालं. त्यामुळे सध्याच्या चर्चेशी त्याचा संबंध नाही. डिलिव्हरी पार्टनर्सना हिरो बनवणं, तसंच आमच्यासाठी प्रत्येक ग्राहकच स्टार आहे, असं आम्हाला दाखवायचं होतं. या जाहिरातीत हृतिक आणि कतरिना डिलिव्हरी पार्टनरशी ज्या प्रकारे आदराने वागतात, तसं सर्वांनीच वागण्याची गरज आहे, याकडेही आम्हाला लक्ष वेधायचं होतं. काही मोजके ग्राहकच प्रत्यक्षात तसं वागतात. डिलिव्हरी पार्टनरच्या कामाला असलेली प्रतिष्ठा दर्शवणं आणि वाढवणं, तसंच आमचे डिलिव्हरी पार्टनर्स किती अभिमानाने आपलं काम करतात हे दर्शवणं, असे उद्देश या जाहिरातीमागे होते, असे झोमॅटोने स्पष्ट केलं आहे. डिलिव्हरी पार्टनर्ससंदर्भातले मुद्दे योग्य रीतीने सोडवण्यासंदर्भात आमची चर्चा सुरू आहे,' असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.