नेपोटिझमवर झोया अख्तरचं मोठं वक्तव्य, म्हणाली - 'माझ्या पैशाने मी काय करावं...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:07 PM2023-12-11T12:07:54+5:302023-12-11T12:11:15+5:30
नेपोटिझमच्या आरोपावर आता झोया अख्तरने मौन सोडले आणि ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
बॉलिवूड अन् नेपोटिझमच नातं हे खुपच जूनं आहे. बॉलिवूडमध्ये चांगल्या कलाकारांना डावलून नेपो बेबीजला प्राधान्य दिले जाते, असा आरोप बऱ्याचदा केला जातो. नुकतेच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' मधून स्टारकिड्स लाँच झाले आहेत. यावरुन नेटकऱ्यांनी झोया अख्तरला ट्रोल केले. नेपोटिझमच्या आरोपावर आता झोया अख्तरने मौन सोडले आणि ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जगरनॉटशी बोलताना जोयानं नेपोटिझमवर भाष्य केलंय. ती म्हणाली, 'मी लोकांचा राग समजू शकते. काही जणांना गोष्टी सहजपणे मिळतात, संधी त्यांच्याकडं चालून येतात. पण बाकीच्यांसोबत हे होत नाही. समाजात सगळ्यांना समान शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. यावर आपण बोलायला हवे. सुहाना खान माझ्या चित्रपटात नसावी, असे तुम्हाला वाटते. पण, एक साधी गोष्ट आहे. ती माझ्या चित्रपटात असली किंवा नसली तरी तुमच्या आयुष्यात कोणताही बदल होणार नाही. मग तो चित्रपट माझा असेल किंवा इतर कुणाचा. खरे तर तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींमुळे बदल होणार आहे, त्यावर तुम्ही बोलायला हवे'.
झोया अख्तर पुढे म्हणाली, 'माझे वडिलांनी अगदी शून्यापासून सुरुवात केली. मी येथेच लहानाची मोठी झाले, त्यामुळे मी काय करायचं, हे हे ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी माझाच आहे. माझ्या वडिलांनी बनवलेल्या संबंधाचा मी एक भाग आहे. मला ते लोक माहित आहेत. मग आता मी काय करणार. माझ्या वडिलांचं अस्तित्त्वच मी नाकारावं का. कारण मला फिल्ममेकर बनायचं आहे. मी माझा व्यवसाय निवडू शकत नसेल तर याला काहीच अर्थ नाही'. खरे तर मुळ विषय हा वेगळाच आहे. जर एकाही स्टारकीडने चित्रपटात काम करायचं नाही ठरवलं, तरीही त्याने तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये'.
पुढे ती म्हणाली, 'जेव्हा मी सार्वजनिक पैसे किंवा इतर कोणाचा पैसा घेते, तो माझ्या मित्र आणि कुटुंबावर खर्च करते. तेव्हा ते नेपोटिझम होईल. पण जेव्हा मी स्वतःचे पैसे खर्च करते ते नेपोटिझम असू शकत नाही. माझ्या पैशाचे मी काय करायचे हे सांगणारे तुम्ही कोण आहात? हे माझे पैसे आहेत. उद्या मला माझे पैसे माझ्या भाचीवर खर्च करायचे असतील तर ती माझी अडचण आहे'.
झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या मध्यमातून शाहरुख खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. या तीन सेलिब्रिटी किड्सव्यतिरिक्त या चित्रपटात मिहिर आहुजा, डॉट, युवराज मेंदा आणि वेदांग रैना हेदेखील आहेत.