बॉलिवूडचा ‘लव्हर बॉय’ गेला, दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 05:32 AM2020-05-01T05:32:32+5:302020-05-01T05:39:01+5:30
६७ वर्षीय ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या पार्थिवावर मरिन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते सावरले नाहीत तोच गुरुवारी रुपेरी पडद्यावर अनेक रोमँटिक भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली. अमिताभ बच्चन यांनी टिष्ट्वटरवरून याची माहिती दिली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ऋषी कपूर यांना बुधवारी रात्री तातडीने गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल केले होते. ६७ वर्षीय ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या पार्थिवावर मरिन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यसंस्कारांप्रसंगी मुलगा रणबीर कपूर, पत्नी नीतू सिंग यांच्यासह कुटुंबातील २० जण उपस्थित होते. आलिया भट, करीना कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, अनिल अंबानी, रिमा जैन, आदर जैन यावेळी उपस्थित होते. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा गुरुवारी सायंकाळी दिल्लीहून मुंबईत पोहोचणार असल्याने तिला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नाही.
अभिनेता इरफान खान यांचे बुधवारी २९ एप्रिलला निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.
११ महिने परदेशात उपचार
न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर ११ महिने ११ दिवस उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी ते उत्सुक होते.
‘बॉबी’, ‘दामिनी’, ‘दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. त्यांची ‘सोचेंगे तुम्हे प्यार’, ‘मेरे उमर के नौजवानो’, ‘हम तुम एक कमरे में’, ‘ये गलिया ये चौबारा’, ‘परदा है परदा’, अशी अनेक गाणीसुद्धा सुपरहिट ठरली.
>काय लिहू? काय लिहायचे हेच समजत नाही. ऋषीजींच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडची मोठी हानी झाली. हे दु:ख सहन करणे माझ्यासाठी कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो!
- गानसम्राज्ञी
लता मंगेशकर