अशी ही बॉलीवूडची ‘प्रचारगिरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2016 03:49 PM2016-08-28T15:49:32+5:302016-08-28T21:23:10+5:30

बॉलीवूडमध्ये आलेल्या या ‘प्रचारगिरी’च्या ट्रेंडचा घेतलेला हा मागोवा...

Bollywood's 'promotion' | अशी ही बॉलीवूडची ‘प्रचारगिरी’

अशी ही बॉलीवूडची ‘प्रचारगिरी’

googlenewsNext
ॉलीवूड’ आणि ‘पॉलिटिक्स’मध्ये कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असा फिल्मी डायलॉग कितीही क्लिशे वाटत असला तरी खरा आहे. अलकिडच्या काळात बॉलीवूड सेलिब्रेटिंचे वर्तन पाहिले तर असे वाटते की ‘फ्रेंडशिप’ डेचा फिव्हर अजूनही उतरलेला नाही. स्टार्स एकमेकांच्या चित्रपटांचे मनमोकळ्या आणि ‘नि:स्वार्थ’पणाने प्रोमोशन करत आहेत.

अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ने हृतिकच्या ‘मोहेंजोदडो’ला मागे टाकत बॉक्स आॅफिसवर शंभर कोटींचा गल्ला जमवला. या यशामागे उत्तम चित्रपट आणि अक्षयची स्टारपॉवर ही कारणे जरी असली तरी विविध सेलिब्रेटिंनी सोशल मीडियावर ‘रुस्तम’चे केलेले प्रोमोशन हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सलमान खान, रणवीर सिंग, वरुण धवन, करण जोहर, आलिया भट यासारख्या स्टार्सनी येनकेन प्रकारे ‘रुस्तम’च प्रचार केला. आणि आता टायगर श्रॉफच्या ‘अ फ्लार्इंग जट’चेसुद्धा अशाच प्रकारे स्टार-प्रोमोशन सुरू आहे.

बॉलीवूडमध्ये आलेल्या या ‘प्रचारगिरी’च्या ट्रेंडचा घेतलेला हा मागोवा...

#बँगबँगडेअर



‘प्रचारगिरी’ची सुरूवात झाली ती दोन वर्षांपूर्वी हृतिकच्या ‘बँग बँग’ सिनेमापासून. प्रोमोशनची नामी शक्कल लढवत हृतिकने ‘आईस बकेट चँलेज’वरून प्रेरणा घेऊन ‘बँग बँग डेअर’ सुरू केले. ट्विटरवर त्याने #बँगबँगडेअर हॅशटॅगसह इतर सेलिब्रेटिंना काही चॅलेंजेस पूर्ण करण्याचे आव्हान दिले. त्यामध्ये आमिर, शाहरुख, अर्जुन कपूर यांनी आपापले चॅलेंज पूर्ण करून दाखविले. पण कमाल केली ती रणवीर सिंगने. हा पठ्ठा ‘क्रिश’च्या वेशभूषेत भर रस्त्यात नाचला. तेव्हापासून बॉलीवूडमध्ये एकमेकांच्या फिल्मस्चा ‘प्रचार’ करण्याचा जणू काही पायांडाच पडला.

दो भाई एक साथ

सलमान-शाहरुखचे वैर आणि दोस्ती दोन्ही फेमस आहे. एक काळ असा होता की, दोघांच्या भांडणामुळे बॉलीवूडमध्ये दोन गट पडले होते. पण आता दोहोंमध्ये ‘आॅल इज वेल’ झाल्यामुळे इंडस्ट्रीमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण आहे. हे दोघे एकमेकांच्या फ्रेंडशिपचा ‘शो आॅफ’ करण्याची एकही संधी सोडत नाहीत. म्हणून तर मागच्या वर्षी सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’चे पहिले पोस्टर शाहरुखने ट्विट करून लाँच केले होते. वाह क्या भाईचारा है!

या वर्षी तर कळसच!

सोनम कपूरच्या ‘नीरजा’मुळे हा ट्रेंड यावर्षीसुद्धा कायम राहिला. निर्मात्यांनी ‘भीती वि. नीरजा’ या कॅम्पेन अंतर्गत सेलिब्रेटिंना त्यांना ज्या गोष्टीची भीती वाटते ती चाहत्यांशी शेअर करण्याची विनंती केली. अनुष्का शर्मा, सलमान खान, परिणिती चोप्रा, हम्रान हाश्मी, शाहीद कपूर यांनी त्याला प्रतिसाद दिला. आपले आवडते कलाकार त्यांची भीती सांगताहेत म्हटल्यावर चाहते मन लावून ऐकणारच. त्यातून चित्रपटाविषयी ‘पॉझिटिव्ह अवेअरनेस’ तयार झाला.

‘प्रचारगिरी’मध्ये सर्वात आघाडीवर असतो तो रणवीर सिंग. ‘रुस्तम’साठी त्याने अक्षयच्याच जुन्या चित्रपटातील ‘जहेर है के प्यार है तेरा चुम्मा’ या गाण्यावर भन्नाट ‘छुपा रुस्तम’ व्हिडियो बनवला होता. टायगर श्रॉफच्या मदतीलासुद्धा अनेक कलाकार आले आहे. ‘फ्लार्इंग जट’मधील ‘बीट पे बुटी’ या गाण्यावर हृतिक, सनी लियोनी, वरुण धवन, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर यांनी आपापले मजेशीर व्हिडियो शेअर केले आहेत.

पण याचा फायदा होतो का?

कोट्यवधी रुपये फिल्म प्रोमोशनवर खर्च करण्यात येतात. रिअ‍ॅलिटी शो, मालिका, इव्हेंटस्, जाहिरातींद्वारे अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करून त्यांना तिकिट खिडकीवर गर्दी करण्यास भाग पाडण्यसाठी निर्मात्यांची धडपड सुरू असते. पण जर एखादा प्रसिद्ध स्टार स्वत:हूनच प्रचार करत असेल (तेसुद्धा फ्री!) तर मग सोन्याहून पिवळे.

जेव्हा सेलिब्रेटी स्वत:हून दुसऱ्या कलाकाराच्या चित्रपटाचे नाव घेतो तेव्हा प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी एक सकारात्मक संदेश जातो. तसेच सोशल मीडियाच्या आगमनामुळे सेलिब्रेटिंनाही विशेष असे कष्ट घ्यावे लागत नाही. एक-दोन ट्विट, फेसबुकवर फोाट/व्हिडियो पोस्ट केला तरी पुरेसे असते.

बर याचा फायदा प्रचार करणाऱ्या कलाकारांनाही होतो. इंडस्ट्रीमधील स्टार्स एकमेकांच्या मदतीला धावून येतात हे पाहून त्यांची इमेजदेखील सुधारते. एकंदर काय तर यामध्ये ‘विन-विन सिच्युएशन’ आहे. ‘आज मी तुझ्या चित्रपटाचे प्रोमोशन करतो, पुढच्या वेळी तु माझ्या सिनेमाचे कर’ असं गृहीत धरूनही कदाचित असे केले जात असावे. ‘गुड फेथ’मध्ये केलेल्या या ‘प्रचारगिरी’चा बॉक्स आॅफिसवर किती फायदा होतो याचा एवढ्या लवकर अंदाज बांधणे अवघड आहे.

पण यामुळे प्रचारावरचा थोडा फार खर्च तरी वाचतो. हे काय कमी आहे?

Web Title: Bollywood's 'promotion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.