बोनी कपूर लवकरच करणार दिग्दर्शन, जान्हवी व अर्जुनला घेऊन बनवणार भाऊ-बहिणीच्या नात्यावर सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 06:00 AM2018-11-25T06:00:00+5:302018-11-25T06:00:00+5:30
कपूर घराण्यातील तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बोनी कपूर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
कपूर घराण्यातील तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बोनी कपूर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांच्या मुलांच्याही भूमिका असणार आहेत. बोनी कपूर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ही माहिती दिली.
बोनी कपूर यांना सुरूवातीपासून दिग्दर्शक व्हायचे होते. शक्ती सामंता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत सहायक म्हणून काम केले. मात्र वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना निर्मात्याची धुरा सांभाळावी लागलीय. आता बोनी कपूर यांना दिग्दर्शन करण्याची इच्छा पूर्ण करायची आहे. त्यामुळे त्यांनी जान्हवी व अर्जुनला घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोनी कपूर म्हणाले की, या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करेन.
भारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या ऑस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक एडिटर, सहाय्यक दिग्दर्शक अशा भूमिकेतून निर्माता झालो. अभिनयाचा प्रांत अनिल कपूरसाठी सोडल्याचे सांगून कपूरांची नवी शाखा आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश झाले. ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा, अशी खंत बोनी कपूर यांनी यावेळी व्यक्त केली. आता बोनी कपूर जान्हवी व अर्जुनला घेऊन कोणता सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.