‘ब्रँजेलिना’चा संसार मोडणार?

By Admin | Published: May 26, 2016 02:55 AM2016-05-26T02:55:23+5:302016-05-26T02:55:23+5:30

हॉलीवूडचे सर्वात हॉट कपल ‘ब्रँजेलिना’चा संसार मोडणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. सिने सेलीब्रिटींचा संसार मोडणे तसे पाहिले तर फार ‘शॉकिंग’ गोष्ट नाही; पण बॅ्रड पिट आणि

Brangelina will break the world? | ‘ब्रँजेलिना’चा संसार मोडणार?

‘ब्रँजेलिना’चा संसार मोडणार?

googlenewsNext

हॉलीवूडचे सर्वात हॉट कपल ‘ब्रँजेलिना’चा संसार मोडणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. सिने सेलीब्रिटींचा संसार मोडणे तसे पाहिले तर फार ‘शॉकिंग’ गोष्ट नाही; पण बॅ्रड पिट आणि अँजेलिना जोलीची गोष्ट जरा वेगळी आहे. ते वेगळे होणार म्हटल्यावर त्यांच्या तमाम चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. एका दशकापेक्षा जास्त काळापासून दोघे एकत्र आहेत. चित्रपट असो वा सामाजिक कार्य, दोघांनीही सतत एकमेकांना सोबत केली आहे. सहा मुलांसह दोघे सुखाने नांदत असताना अचानक घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या. त्यात काही तथ्य आहे का नाही हे येत्या काळात कळेलच. पण तत्पूर्वी ब्रँजेलिनाची लव्हस्टोरी सुरू कशी झाली आणि ती तुटण्याच्या मार्गावर कशी पोहोचली याचा ‘सीएनएक्स’ने घेतलेला हा आढावा.

प्रेमांकुर
अँजेलिना आणि ब्रॅड यांची पहिली भेट झाली ती २००४ साली ‘मि. अँड मिसेस स्मिथ’ या चित्रपटाच्या सेटवर. त्या वेळी बॅ्रड पिटची पत्नी होती ‘फ्रेंड्स’ स्टार जेनिफर अ‍ॅनिस्टन. चित्रपटात गुप्तहेर जोडप्याची भूमिका साकारताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. एका मुलाखतीमध्ये बॅ्रड म्हणाला होता की, अँजेलिनाला भेटण्याआधी त्याच्या आयुष्याला काही अर्थ नव्हता. प्रेमांकुर फुलल्यावर त्याने २००५ साली जेनिफरशी असलेला पाच वर्षांचा संसार मोडला. तोपर्यंत ब्रॅड आणि अँजेलिना यांच्या नात्याची कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. पुढे अँजेलिना आणि तिचा मुलगा मॅडॉक्ससोबत ब्रॅड सुट्या एन्जॉय करीत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यावर मात्र दोघे सीरियस रिलेशनशिपमध्ये आहेत हे पक्के झाले.

फॅमिली प्लॅनिंग
जुलै, २००५ मध्ये अँजेलिना झहेरा मार्ले नावाच्या सहा वर्षांच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी इथोपिया देशात गेली होती. तिच्याबरोबर कोण गेले असणार? बरोबर. दुसरा कोण? खुद्द ब्रॅड पिट. नंतर सहा महिन्यांनी कॅलिफोर्नियातील कोर्टाने दत्तक घेतलेल्या मुलांचे आडनाव बदलून ‘जोली-पिट’ करण्याची अँजेलिनाची विनंती मान्य केली. लगेच २००६ साली जानेवारी महिन्यात अँजेलिना प्रेग्नंट असल्याची असल्याची बातमी आली. स्वत: बाळाची आई होण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. बाळाचा पिता ब्रॅड असल्याचे तिने घोषित केले. त्या वर्षी मे महिन्यात त्यांची मुलगी शिलोह नौवेलचा जन्म झाला. आता पाच जणांचे हे कुटुंब आणखी मोठे करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. २००७ साली त्यांनी व्हिएतनाम येथील अनाथलयातून तीन वर्षीय पॅक्स थिएन या मुलाला दत्तक घेतले. २००८ साली त्यांना नॉक्स लिओन आणि व्हिव्हिएन मार्चिलिन अशी जुळी मुलं झाली. अशा प्रकारे सहा मुलांचे त्यांचे कुटुंब कायम मीडियाच्या आकर्षणाचे केंद्रबिदू राहिले.

एंगेजमेंट
सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतरही बँ्रजेलिना हॉलीवूडचे हॉटेस्ट कपल होते यात काही वादच नव्हता. सहा मुलांचे कुटुंब एकत्रितपणे सांभाळताना दोघांचे करिअरही जोरात सुरू होते. परंतु दोघांनी अद्यापही लग्न केलेले नव्हते. अखेर एप्रिल, २०१२ मध्ये त्यांनी एंगेजमेंट करून यादृष्टीने पहिले पाऊल टाकले. दोघे लग्न कधी करणार या चर्चेला मीडियामध्ये उधाण आले. त्यांनी गुपचुप लग्न केल्याच्यासुद्धा बातम्या येऊ लागल्या. परंतु लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार याचा कोणीच विचार केला नसेल.

अन् अखेर लग्न!
ब्रँजेलिनाच्या लग्नाची बातमी ऐकण्यास उत्सुक असलेल्या त्यांच्या चाहत्यांना अखेर आॅगस्ट, २००८ साली दिलासा मिळाला. फ्रान्समध्ये एका खासगी समारंभामध्ये दोघांनी आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेऊन विवाह केला. या वेळी केवळ त्यांचा जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. काही महिन्यांपूर्वी अँजेलिनाने एका मुलाखतीमध्ये विवाहसोहळा कसा असणार याबाबत माहिती दिली होती. ती म्हणाली होती की, लग्न कसे करायचे याचा संपूर्ण निर्णय आम्ही मुलांशी चर्चा करूनच घेणार आहोत. त्यांना आवडेल, ते एन्जॉय करतील, ते म्हणतील त्याच पद्धतीने आम्ही लग्न करणार आहोत. ब्रँजेलिनाचे लग्न त्या वर्षीचा सर्वात हॉट टॉपिक ठरला हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

एकमेकां साह्य करू...
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ब्रँजेलिनाचे विचारही सारखे होते. आपले स्टेटस, प्रभाव आणि संपत्तीचा समाजाला लाभ व्हावा या विचाराने त्यांनी २००६ साली सामाजिक संस्था ‘जोली-पिट फाउंडेशन’ स्थापन केली. अँजेलिना मानवाधिकार, शिक्षण, स्त्रीहक्क अशा विविध सामाजिक कार्यांत अग्रेसर असते. संयुक्त राष्ट्राबरोबर मिळून निर्वासितांच्या प्रश्नावर
तिने केलेल्या कार्याचा जगभर गौरव करण्यात आला आहे. ब्रॅड पिटदेखील आपल्या पत्नीला वेळोवेळी साथ देतान दिसतो.

घटस्फोटाची ‘कथित’ कारणे
सुपरकपल ब्रँजेलिनाच्या नात्यात दुरावा आला असून लवकरच दोघे विभक्त होणार असल्याचा दावा एका मासिकाने केला आहे. त्यानुसार दुराव्यामागची काही कारणे सांगण्यात आली आहेत.
बॅ्रड पिट आणि आॅस्कर विजेती अभिनेत्री मेरियन कोटिलार्ड यांच्यामध्ये जवळीकता वाढली आहे आणि तेच अँजेलिनाला खटकत आहे. ज्या पद्धतीने ब्रॅडने जेनिफरला सोडून तिच्याशी संसार थाटला, तसेच तो आता तिला सोडून मेरियनच्या प्रेमात अडकण्याची तिला भीती वाटत आहे.
अँजेलिनाला दिग्दर्शनाकडे यापुढे लक्ष द्यायचे आहे. म्हणून ती ब्रॅडला मुलांकडे अधिक लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ काढण्यास दबाव टाकत आहे. मात्र, ब्रॅडलादेखील आपले करिअर सांभाळायचे आहे. त्यामुळेही दोघांत वरच्यावर खटके उडत आहेत.
ब्रॅड अँजेलिनाच्या आरोग्याविषयी फार चिंतेत असतो. मध्यंतरी तिच्यावर ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करण्यात आली होती. तसेच तिचे वजन 35 किलोपर्यंत घटल्याचीदेखील बातमी आहे. वेळावेळी सांगूनही ती आरोग्याकडे दुर्लक्ष करते. यामुळे चिडलेल्या ब्रॅडने कायमचाच काय तो सोक्षमोक्ष करण्याचे ठरविल्याची चर्चा आहे.

- mayur.deokar@lokmat.com

 

Web Title: Brangelina will break the world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.