सगळ्याच आघाड्यांवर फसलेला

By Admin | Published: August 7, 2015 10:50 PM2015-08-07T22:50:55+5:302015-08-07T22:51:22+5:30

हिंदू-मुस्लीम आणि दहशतवाद हे विषय घेऊन बॉलिवूडमध्ये सतत चित्रपट तयार होत असतात. ‘पीके’ ते ‘ओ माय गॉड’ धर्म तर ‘ए वेनस्डे’ हा दहशतवादावर आधारित होता

Caught on all the fronts | सगळ्याच आघाड्यांवर फसलेला

सगळ्याच आघाड्यांवर फसलेला

googlenewsNext

हिंदू-मुस्लीम आणि दहशतवाद हे विषय घेऊन बॉलिवूडमध्ये सतत चित्रपट तयार होत असतात. ‘पीके’ ते ‘ओ माय गॉड’ धर्म तर ‘ए वेनस्डे’ हा दहशतवादावर आधारित होता. फरहान अख्तरच्या कंपनीने बनविलेला ‘बंगिस्तान’चा आधार धर्म व दहशतवाद असा असून, त्याला ना शेंडा ना बूड अशी त्याची अवस्था आहे. पटकथा अत्यंत दुबळी असल्यामुळे एखादी बाब का असेना चांगली म्हणावी, असे ‘बंगिस्तान’मध्ये काहीही नाही.
बंगिस्तान हा काल्पनिक देश. त्यात राहणारा हाफीज (रितेश देशमुख) आणि भारतातील एका धार्मिक संघटनेचा अनुयायी पवन (पुलकीत सम्राट) या दोघांना पोलंडमधील वेगवेगळ्या धार्मिक नेत्यांच्या परिषदेत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी पाठविले जाते. तेथे जाण्यासाठी पवन व हाफीज आपली वेषभूषा बदलतात. पवन मुस्लीम बनतो व आपली खरी ओळख समोर येऊ नये म्हणून आपले नाव अल्लारखां ठेवतो. याच उद्देशाने हाफीजही आपले नाव ईश्वरचंद ठेवतो. परिषदेला जायच्या आधी या दोघांचा एकमेकांशी परिचय होऊन ते मित्र बनतात. या मैत्रीत त्यांना गीता आणि कुराणमध्ये प्रत्येकाने एक चांगला नागरिक व्हावे असा संदेश असल्याची जाणीव होते. हाच संदेश या दोघांची विचारसरणी बदलण्यास साह्यभूत ठरतो व शेवटी हे दोघेही परिषदेला बॉम्बस्फोटापासून वाचवितात.
उणिवा : दुबळेपणा आणि चुका घाऊक प्रमाणात दाखवता येतील असा हा चित्रपट आहे. कथा ते पटकथेपर्यंत ‘बंगिस्तान’ एवढा कमकुवत आहे की, कोणालाही यावर कष्ट करावेसे वाटू नये? पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेले दिग्दर्शक करण अंशुमान आणि त्यांच्या लेखकांच्या संचाने कणाहीन कथेची निवड केली आहे. चित्रपटाचे नाव ‘बंगिस्तान’ असले तरी कथेचा बहुतेक भाग हा धार्मिक नेत्यांची परिषद ज्या देशात भरणार आहे तेथील आहे. परंतु परिषदेचा विषय शेवटच्या १० मिनिटांत येतो. त्याआधी ‘बंगिस्तान’चा प्रवास चालक व ब्रेक नसलेल्या वाहनासारखा भरकटला आहे. ‘बंगिस्तान’मधील काही संवादाने धार्मिक भावना दुखावू शकतील. चित्रपट कॉमेडीसारखा सादर करण्यात आला असला तरी कॉमेडीच्या नावाने त्यात काहीही नाही. ‘बंगिस्तान’मध्ये असे एकही पात्र नाही की प्रेक्षक त्याच्यासोबत टिकून राहतील. रितेश आणि पुलकीत यांच्या भूमिकाच एवढ्या दुबळ्या आहेत की इतर पात्रांबद्दल न बोललेलेच बरे. जॅकलीन फर्नांडिस ‘बंगिस्तान’मध्ये नेमके काय करीत आहे याची तिलादेखील माहिती नसेल. एक गीत आणि चार दृश्यांतील तिचे ‘रोझी’ नावाचे पात्र मारूनमुटकून बनविण्यात आले आहे. रितेश आणि पुलकीत यांनी अभिनयात अत्यंत निराश केले आहे. विशेषत: पुलकीतवर सलमान खानची एवढी नशा चढली आहे की पुलकीतचे यापुढे काय होईल याची काळजीच वाटते. विशेष उल्लेख करावा असा चरित्र अभिनेता / अभिनेत्रीही नाही. प्रत्येक जण जणू कसातरी वेळ घालवताना दिसतोय. गीत आणि संगीताची आघाडीही फारच कमकुवत आहे; कारण एकही गाणे आठवत नाही. दिग्दर्शक म्हणून करण अंशुमान आपल्या पहिल्याच प्रयत्नात सपशेल अपयशी ठरला आहे.
वैशिष्ट्ये : वैशिष्ट्ये म्हणता येतील असे काही ‘बंगिस्तान’मध्ये नाही. विदेशातील स्थळांचे चित्रीकरण उत्तम आहे.

Web Title: Caught on all the fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.