यंदाचा इफ्फी सेलिब्रेटी कलाकारांशिवाय, मराठीच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांचीही अनुपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 05:25 PM2021-01-23T17:25:17+5:302021-01-23T17:25:25+5:30
IFFI News : कोरोनामुळे यावेळच्या इफ्फीत अनेक बॉलिवूडचे कलाकार येणार नाहीत असाच अंदाज होता,तो खरा ठरला
-संदीप आडनाईक
पणजी - कोरोनाचे कारण पथ्यावर पडल्यामुळे यंदाच्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सेलिब्रेटी कलाकारांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. नेहमी येणारे जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आदी हिंदी, मराठी कलाकारही गोव्यात आलेले नाहीत.
कोरोनामुळे यावेळच्या इफ्फीत अनेक बॉलिवूडचे कलाकार येणार नाहीत असाच अंदाज होता,तो खरा ठरला. महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्यामुळे नाराज प्रतिनिधींना केवळ काही मोजक्याच पण सेलेब्रिटी नसलेल्या कलाकारांवर समाधान मानावे लागले.
दरवर्षी गोव्यात भरणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट महोत्सवाचे दिवस आता दहावरुन आठवर आले आहेत. यंदा प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची संख्याही मोजकीच आहे, शिवाय यंदा माध्यमांचे प्रतिनिधीही फारसे दिसत नाहीत. यातच भर म्हणून की काय एकही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी इथे आलेला नाही. बॉलिवूडमधीलही बरेच कलाकार तर केवळ इफ्फीचा भाग असलेल्या फिल्म बाजारसाठी गोव्यात येत असतात,परंतु यावेळी फिल्म बाजारही गुंडाळलेला आहे. त्याऐवजी अनेक मास्टर क्लास, चर्चासत्र यांचा समावेश असलेल्या ऑनलाईन, ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करून बाहेरच्या सिनेप्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न यंदा केला आहे. अर्थात प्रत्यक्ष सिनेमागृहात सिनेमा पाहण्याचे समाधान जसे मिळत नाही, त्याप्रमाणेच प्रत्यक्ष इफ्फीस्थळावर किंवा या अनोख्या माहोलमध्ये असण्याचे समाधान यातून मिळत नाही, हेही तितकेच खरे.
यावेळी इफ्फीत मनोज जोशी, पद्मिनी कोल्हापुरे, नेहा पेंडसे, डॉ. मोहन आगाशे यासारखे मान्यवर सेलिब्रेटी इफ्फीत होते, परंतु त्यांचे चित्रपट दाखवले जात होते, म्हणूनच ते आले होते, समारोपाच्या समारंभालाही जुन्या काळातील अभिनेत्री झीनत अमान उपस्थित राहणार आहे.