सेन्सॉर बोर्ड की ‘सीझर’ बोर्ड?

By Admin | Published: June 12, 2016 01:31 AM2016-06-12T01:31:55+5:302016-06-12T01:31:55+5:30

‘उडता पंजाब’ सिनेमातील ८९ दृश्यांना कात्री लावल्याच्या कारणावरून सध्या बॉलीवूड विरुद्ध सेन्सॉर असा वाद रंगलाय. याच निमित्ताने गेल्या वर्षभरात सेन्सॉरच्या कचाट्यात

Censor Board's 'Caesar' Board? | सेन्सॉर बोर्ड की ‘सीझर’ बोर्ड?

सेन्सॉर बोर्ड की ‘सीझर’ बोर्ड?

googlenewsNext

‘उडता पंजाब’ सिनेमातील ८९ दृश्यांना कात्री लावल्याच्या कारणावरून सध्या बॉलीवूड विरुद्ध सेन्सॉर असा वाद रंगलाय. याच निमित्ताने गेल्या वर्षभरात सेन्सॉरच्या कचाट्यात अडकलेल्या सिनेमांचीही चर्चा होणेही अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, हे सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकण्यामागे किसिंग किंवा अश्लील सीन नसल्याचेही पाहायला मिळाले. असेच काही चित्रपट जे सेन्सॉरच्या कात्रीत अडकले होते, त्यांचा हा आढावा.

वीरप्पन
काही दिवसांपूर्वी चंदन तस्कर वीरप्पनच्या जीवनावर आधारित सिनेमा बॉक्स आॅफिसवर आला. मात्र, सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला ए सर्टिफिकेट दिले. शिवाय या सिनेमातील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची हत्या एलटीटीईचा म्होरक्या व्ही. प्रभाकरनने घडवून आणल्याचा उल्लेख काढण्यात आला. हा उल्लेख सिनेमात असेल, तर तमिळ संघटना नाराज होतील आणि वाद निर्माण होईल, अशी भीती सेन्सॉरला होती.

अलीगढ
अलीगढ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिल्याने सोशल मीडियावर बराच वाद रंगला. हंसल मेहता यांचा हा सिनेमा अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा एक प्रोफेसर आणि समलिंगी संबंधांवर आधारित होता. सेन्सॉरने सुचवलेल्या कट्सनंतरच हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकला.

द जंगल बुक
काही दिवसांपूर्वी रूपेरी पडद्यावर झळकलेला हा सिनेमा छोट्यांना भावला असला, तरी हा सिनेमाही सेन्सॉरच्या कात्रीतून वाचू शकला नाही. सेन्सॉरने या सिनेमाला यू-ए सर्टिफिकेट दिल्याने सेन्सॉर बोर्डाला टीकेचा सामना करावा लागला. कारण सेन्सॉरच्या या सर्टिफिकेटमुळे बारा वर्षांखालील मुलांना कुण्या प्रौढ व्यक्तीसोबतच हा सिनेमा पाहणे बंधनकारक करण्यात आले. सिनेमातील थ्री-डी इफेक्ट्समुळे लहान मुले घाबरतील, असे कारण या सर्टिफिकेटमागे असल्याचे सेन्सॉरने सांगितले.

एनएच-10
अनुष्का शर्मा स्टारर हा सिनेमाही सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला. अतिभडक संवाद आणि हिंसक दृश्यांमुळे सिनेमा वादात अडकला होता. सेन्सॉरकडे सर्टिफिकेटसाठी गेले असता, निम्म्याहून अधिक बोर्ड सदस्यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट सिनेमाचे दिग्दर्शक नवदीप सिंग यांनी केला होता.

या सिनेमांनाही बसला फटका
या ना त्या कारणाने सेन्सॉरच्या कात्रीत हे सिनेमा अडकले. मात्र, एडल्ट सेक्स कॉमेडी सिनेमाही सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीपासून वाचू शकले नाही. हे सिनेमासुद्धा सेन्सॉरच्या कचाट्यात अडकले.

मस्तीजादे
सनी लिओनीचा ‘मस्तीजादे’ हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकला. सिनेमातील एक दोन नाही, तर तब्बल ३८१ कट्सनंतर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. सेन्सॉरच्या या निर्णयावर सोशल मीडियातून टीका झाली.

क्या कूल है हम 3
क्या कूल है हम सीरिजमधील तिसरा सिनेमाही सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला. सेन्सॉरने सुचवलेल्या १३९ कट्सनंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. याशिवाय बँडिट क्वीन, फायर, परझानिया, उर्फ प्रोफेसर, द पिंक मिरर, पाँच, ब्लॅक फ्रायडे, कामसूत्र, सीन्स, वॉटर, फिराक, इन्शाअल्लाह-फुटबॉल असे सिनेमाही सेन्सॉरच्या कात्रीत अडकले होते.

‘उडता पंजाब’ सिनेमावर सेन्सॉरने घेतलेल्या आक्षेपावर सारे बॉलीवूड एकवटले. सिनेमा आणि टीव्ही दिग्दर्शक असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन सेन्सॉरविरोधात संताप व्यक्त केला.

सेन्सॉर बोर्डाची मनमानी सुरू असून, एखाद्या सिनेमाला नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार फक्त चित्रपट रसिकांनाच आहे.
- अनुराग कश्यप

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा मोठा हल्ला आहे. त्यामुळे सारे बॉलीवूड एकजूट असून, याचा आम्ही विरोध करणार.
- इम्तियाज अली

देशात काय चाललेय काही कळायला मार्ग नाही, सेन्सॉर बोर्डाचा निर्णय खरेच संतापजनक आहे.
- झोया अख्तर

आपला देश सौदी अरबसारखा होऊ नये, जिथे संपत्ती आणि श्रीमंती आहे. मात्र, अभिव्यक्त होण्यावर मनाई आहे. विचारांची गरिबी आहे.
- महेश भट्ट

--------------------- suvarna.jain@lokmat.com

Web Title: Censor Board's 'Caesar' Board?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.