'परिस्थिती खूप बिकट होती, दोन वेळचं जेवणही..'; 'चला हवा येऊ द्या'फेम अभिनेत्रीने सांगितली कुटुंबाची स्ट्रगल स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 08:52 AM2023-06-19T08:52:47+5:302023-06-19T08:54:09+5:30
Actress: विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या वडिलांचा स्ट्रगल सांगितला आहे.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना मनापासून हसवतो. मात्र, प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कलाकारांनी यशस्वी होण्यासाठी बराच मोठा संघर्ष केला आहे. अनेकांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. आज या शोमधील अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. 'फादर्स डे'निमित्त या अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या संघर्षावर भाष्य केलं आहे.
विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम (snehal shidam). अलिकडेच स्नेहलने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने कसं घर उभारलं हे सांगितलं.
"बाबा कधीच आम्हाला त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी सांगत नाहीत. गावची परिस्थिती खूप बिकट होती. त्यामुळे गावावरुन ते मुंबईला पळून आले होते. पण, मुंबईत आल्यानंतरही त्यांचे हाल संपले नाही. इथे आल्यावर त्यांच्याकडे राहायला जागा नव्हती. त्यामुळे मग ते रस्त्यावर झोपायचे किंवा मग एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे काही दिवस रहायचे. आता या सगळ्या गोष्टी ते गंमतीने सांगतात. पण, तेव्हा त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. आई-बाबांचं लव्हमॅरेज आहे. दोघंही एकाच चाळीत राहायचे. त्यावेळी बाबांना दोन वेळचं जेवण मिळेल की नाही अशी परिस्थिती होती. तर, आईसुद्धा लहान असल्यापासून घरकाम करायची", असं स्नेहल म्हणाली.
पुढे ती म्हणते, "ज्यावेळी मी चला हवा येऊ द्यामध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळी आईला ठणकावून सांगितलं की, यापुढे तू घरकाम करायचं नाहीस. आई घरकाम करते या गोष्टीची लाज वाटेल या उद्देशाने मी तिला असं सांगितलं नाही. तर, तिला आता आराम मिळावा हा माझा त्यामागचा उद्देश होता. मधल्या काळात काही कारणास्तव आम्हाला आमचं राहतं घर विकावं लागलं. त्यामुळे आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. पण, त्या दोघांनी इतके कष्ट केले की आम्ही ज्या चाळीतल्या घरात राहत होतो तेच घर त्यांनी पुन्हा विकत घेतलं. मला माझ्या आईवडिलांकडे पाहून फार भारी वाटतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते थकत नाहीत, हार मानत नाहीत."
दरम्यान, स्नेहलने तिच्या विनोदबुद्धीच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. स्नेहल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिच्या जीवनात घडणाऱ्या लहानमोठ्या गोष्टी ती कायम चाहत्यांसोबत शेअर करते.