त्याचं जागरण होऊ नये म्हणून ती..., अशी आहे ‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळेची ‘सावित्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:00 AM2022-06-14T08:00:00+5:302022-06-14T08:00:02+5:30
Nilesh Sabale wife Gauri Sable: निलेश मोठा सेलिब्रिटी असला तरी त्याची पत्नी गौरी कायम लाईमलाईटपासून दूर राहते. पण निलेशची सावली बनून वावरते.
‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya ) हा सगळ्यांचाच आवडता शो. केवळ सामान्य प्रेक्षकांमध्येच नव्हे तर सेलिब्रेटींमध्ये देखील हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आजवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या शोचा होस्ट डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) सतत चर्चेत असतो. त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक फॅन्स आहेत. पण सध्या त्याची नाही तर त्याच्या ‘सावित्री’ची चर्चा आहे. होय, झी मराठीवर आज ‘सत्यवान सावित्री’ ही नवी कोरी मालिका सुरू झालीये. या मालिकेच्या निमित्तानं निलेश साबळेनं त्याच्या ‘सावित्री’बद्दल अर्थात पत्नीबद्दल खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
निलेश साबळेच्या पत्नीचं नाव गौरी साबळे आहे. निलेश हा अभिनेता असला तरी तो आयुर्वेदिक डॉक्टर आहे, हे सगळ्यांच माहित आहे. निलेशची पत्नी ही सुद्धा डॉक्टर आहे. निलेश मोठा सेलिब्रिटी असला तरी गौरी कायम लाईमलाईटपासून दूर राहते. पण निलेशची सावली बनून वावरते.
ती माझ्या आयुष्यातील सावित्री...
‘प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सावित्री फार महत्वाची असते ती म्हणजे आपली अर्धांगिनी. प्रत्येकाच्या आयुष्यात पत्नी ही महत्त्वाची असते. तशीच माझ्याही आयुष्यात आहे आणि तिचं आहे नाव डॉ गौरी साबळे. आमच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. या सगळ्या प्रवासात तिने मला भरभरून साथ दिली. खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. खरं तर आमचा प्रेमविवाह आहे. जेव्हा मी काहीही कमवत नव्हतो. तेव्हा तिने मला विचारलं होतं की, तू डॉक्टर आहेस तेव्हा तू प्रॅक्टिस करणार की आवडत्या क्षेत्रात काम करशील? मी तिला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की, कदाचित मी प्रॅक्टिस करणार नाही. तिने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. तुला लवकर काम मिळालं नाही तरी मी तुझ्यासोबत आहे. मी प्रॅक्टिस करेन आणि घर चालवेन, तुला ज्या क्षेत्रात जायचंय, त्या क्षेत्रात जा, असं ती मला म्हणाली होती.
माझ्या प्रत्येक कामात ती साथ देते. ती सुद्धा कलाकार आहे. ती उत्तम गाते. तिला चित्रकलेची आवड आहे. पण केवळ आणि केवळ मला पुढे जाता यावं म्हणून ती तिच्या या कलांकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आली आहे. मला वाटतं की, तिने सुद्धा तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं. माझ्या प्रत्येक गोष्टीत ती माझी साथ देते. माझं जास्त जागरण होऊ नये म्हणून तिने लिखाण, एडिटींगसुद्धा शिकून घेतलं आहे. ती विनोद सुचवते, वेगवेगळ्या कल्पना मांडते या सगळ्या गोष्टीत ती फार चांगल्यारितीने सहभाग दर्शवते. मला माझ्या कामात आनंद मिळावा, असे तिला सतत वाटत असते. ती माझी सावित्री आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो, असं निलेश म्हणाला.
अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी
निलेश आणि गौरी एका कॉलेजमध्ये नव्हते. मग त्यांची ओळख कशी झाली? तर निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला असता तिथं गौरीसोबत त्याची ओळख झाली. त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले. नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 2013 साली दोघांनी लग्न केलं.