बिझनेस फॅमिलीतील नात्यांचा बदलता पट
By Admin | Published: October 11, 2015 04:06 AM2015-10-11T04:06:24+5:302015-10-11T04:06:24+5:30
आजच्या या वेगाने बदलणाऱ्या काळातही अनेक एकत्र कुटुंब पद्धती जपणारी कुटुंबं अगदी शहरातही अस्तित्वात आहेत. त्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येकाचाच स्वभाव दुसऱ्यापेक्षा
आजच्या या वेगाने बदलणाऱ्या काळातही अनेक एकत्र कुटुंब पद्धती जपणारी कुटुंबं अगदी शहरातही अस्तित्वात आहेत. त्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येकाचाच स्वभाव दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. पण काही जण मनातील भावना बोलून दाखवू शकतात, तर काही न बोलताच स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व तयार करू पाहतात. त्यात पण मोठा बिझनेस करणारे मात्र एका वाड्यात राहणारे कुटुंब अचानक भल्यामोठ्या घरात शिफ्ट झाले तर? तेव्हा होणारा बदल हा केवळ राहणीमानातला नसतो... तर तो स्वभावापासून एकमेकांमध्ये कराव्या लागणाऱ्या तडजोडी, त्यावर व्यक्त होण्याच्या पद्धतीत होत जाणारे बदल अशा वेळेस प्रकर्षाने दिसून येतात. नेमका हाच बदल हेरला आहे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी. स्वत: पुण्यात जन्मलेल्या, बदलत असलेल्या पुणे शहराचा अनुभव, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत सचिन कुंडलकर यांनी ‘राजवाडे अँड सन्स’ हा चित्रपट तयार केला.
एखाद्यावर आपलं प्रेम असेल तर त्याला बंधनात ठेवण्यापेक्षा समोरच्याला बंधनातून मुक्त केले तर प्रेम तसंच राहू शकतं का, असा प्रश्न विचारणारा आणि राहू शकतं असं उत्तर देणारा हा आधुनिक चित्रपट आहे. येत्या १६ आॅक्टोबरला ‘राजवाडे अँड सन्स’ महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त अभिनेते सचिन खेडेकर, चित्रपटाचे निर्माते व अभिनेते अतुल कुलकर्णी, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ मेनन आणि कृत्तिका देव यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली.
ज्याला एका पद्धतीचंच जगणं आवडतं आणि आता मला बदलणं शक्य नाही, माझं ते वय नाही, ते वय निघून गेलंय, असं मानलेली आपल्याकडे अनेक माणसं आहेत. त्यांच्या स्वभावाशी जवळ जाणारं विद्याधर राजवाडेचं माझं पात्र आहे. माझ्यासाठी हा रोल खूप आव्हानात्मक वाटला, कारण या पात्राच्या अनेक गोष्टी माझ्या स्वभावाच्या जवळ जाणाऱ्या आहेत. त्यामुळे ते चित्रपटात उतरवणं हे माझ्यासाठी अवघड होतं.
- सचिन खेडेकर, अभिनेता
आपल्याकडे बऱ्याचदा पुढील काळातील किंवा मागच्या काळातील चित्रपट बनवले जातात. पण समकालीन चित्रपटांचं प्रमाण खूप कमी आहे. तसाच राजवाडे अँड सन्स हा आजच्या काळातील शहरी सिनेमा आहे. गेल्या काही वर्षांतील बदलत्या आणि वाढत्या पुण्याचं प्रतिबिंब यामध्ये दाखवलं आहे. त्यामुळे त्याचे चांगले-वाईट परिणाम होणारच आहेत. पण त्यासाठीच आपण त्या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. - अतुल कुलकर्णी, निर्माता आणि अभिनेता
मी एका शांत, खूप कमी वेळा व्यक्त होणाऱ्या मुलाची भूमिका साकारली आहे. खरं सांगायचं तर मी यापूर्वी साकारलेल्या भूमिकांशी मी लगेच रिलेट होऊ शकलो. पण या चित्रपटात मलाच का घेतलं आहे, असा प्रश्न पहिल्यांदा मला पडला. विराजस हे पात्र कुटुंबातील प्रत्येकाबद्दलच खूप पझेसिव्ह असतं. माझ्या स्वभावातील हा एकच गुण त्या पात्राशी जुळणारा आहे. - सिद्धार्थ मेनन, अभिनेता
यामध्ये मी अनय राजवाडेची भूमिका साकारली आहे. यामध्ये अनयचे दोन स्वभाव बघायला मिळतात. एक म्हणजे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भाग असलेला, बिझनेसमध्ये सहभागी होणारा अनय आणि दुसरा अनय त्या बिझनेसशिवाय काय करतो, कुठे जातो हे कोणालाच माहीत नसलेला, पण स्वत:च्या मतांवर ठाम असलेला आणि शांत राहून निर्णय घेणारा अनय यामध्ये पाहायला मिळतो. - आलोक राजवाडे, अभिनेता
मी अनन्या या एका स्ट्राँग असलेल्या महत्त्वाकांक्षी मुलीचं पात्र साकारलं आहे. ही एक अँबिशियस, मॉडेल व्हावंसं वाटणारी मुलगी आहे. जे की इतक्या नावाजलेल्या कुटुंबामध्ये अजिबातच सूट होणार नाहीये. तिला पुढे काय करायचंय हे तिचं निश्चित असल्यामुळे विरोध झाला तरी त्या दिशेने वेगाने धावणारी आणि या प्रोटेक्टेड कुटुंबातून बाहेर पडल्यावर काय मिळू शकतं हे पाहण्यासाठी धडपड ती करत असते. एकटी राहून काय करू शकते हे पाहण्याची तिला इच्छा आहे.
- मृण्मयी गोडबोले, अभिनेत्री
मी श्वेता चौघांमधील सगळ्यात लहान, शांत, कधीही कोणाला उलटून न बोलणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिच्या विचारांबद्दल किंवा पुढे जे काही करायचं आहे, त्याबद्दल ती खूप ठाम आहे पण बोलून नाही दाखवत. नावाजलेल्या कुटुंबातील असल्याने तोच बिझनेस वाढवण्यासाठी काम करायचं हे आजोबांचं मत न पटणारी, तिला जे आवडतंय त्या दिशेने झेपावू इच्छिणारी आहे. - कृत्तिका देव, अभिनेत्री