मराठी नाटकांना इंग्रजीची मोहिनी! अर्धा डझनहून अधिक नाटके करत आहेत रसिकांचे मनोरंजन

By संजय घावरे | Published: August 16, 2023 01:02 PM2023-08-16T13:02:49+5:302023-08-16T13:04:05+5:30

सध्या इंग्रजी टायटल असलेली अर्धा डझनहून अधिक मराठी नाटके रसिकांचे मनोरंजन करीत आहेत.

charm of english to marathi dramas more than half a dozen plays are entertaining the fans | मराठी नाटकांना इंग्रजीची मोहिनी! अर्धा डझनहून अधिक नाटके करत आहेत रसिकांचे मनोरंजन

मराठी नाटकांना इंग्रजीची मोहिनी! अर्धा डझनहून अधिक नाटके करत आहेत रसिकांचे मनोरंजन

googlenewsNext

संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवसेंदिवस मराठी रंगभूमीवर इंग्रजी शिर्षक असलेल्या मराठी नाटकांची संख्या वाढतच आहे. या नाटकांची ‘कॅची टायटल्स’ रसिकांच्या मनावर मोहिनी घालण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सध्या इंग्रजी टायटल असलेली अर्धा डझनहून अधिक मराठी नाटके रसिकांचे मनोरंजन करीत आहेत.

 ७०च्या दशकातील ‘हॅंड्सअप’ आणि ‘शॉर्टकट’ या गाजलेल्या नाटकांच्याही पूर्वीपासून मराठी रंगभूमीवर इंग्रजी शीर्षक देण्याचा ट्रेंड सुरू आहे. ५० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘डार्लिंग डार्लिंग’ या गाजलेल्या नाटकाचे टायटलही इंग्रजी होते. ‘ऑल द बेस्ट’ हे इंग्रजी टायटल असलेले नाटक केवळ गाजलेच नाही, तर त्याने कित्येक कलाकार, तंत्रज्ञ घडविले.  ‘व्हाईट लिली नाईट रायडर’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘लव्हबर्ड्स’ अशा बऱ्याच नाटकांनी मराठी रसिकांना भुरळ घातली. सध्या ‘व्हॅक्युम क्लिनर’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘यू मस्ट डाय’, ‘ब्रँड ॲम्बॅसेडर’, ‘डाएट लग्न’, ‘मंकी इन द हाऊस’ ही इंग्रजी शिर्षक  आहेत.

अशाच नाटकांना टायटल्स

‘यू मस्ट डाय’ नाटकाला ‘तुला मेलंच पाहिजे’ किंवा ‘परफेक्ट मर्डर’ला ‘खराच मृत्यू’ हे टायटल योग्य वाटले नसते. कधी कधी शाब्दिक वजनाचा मुद्दा येतो. बऱ्याचदा ‘ऑल द बेस्ट’ किंवा ‘डेंजरस गेम’सारखे फार प्रचलित शब्द वापरले जातात, जे लोकांना समजायला सोपे जातात.    

‘थँक यू मि. ग्लॅड’ या नाटकात जेलर आणि नक्षलवाद्याचा संवाद होता; पण आकर्षक टायटलमुळे हे नाटक पाहिले गेले. ‘गेट वेल सून’ हे चंद्रकांत कुलकर्णींचे मराठी नाटक व्यसनमुक्तीवर होते. यात व्यसनी व्यक्तीने बरे झालेच पाहिजे; पण दुसऱ्यानेही बरे व्हायला पाहिजे, असा मेसेज होता.

यासाठी इंग्रजीचा आधार 

- नाट्यलेखकाची पहिली पसंती मराठीच असते; पण शिर्षक नीट पोहाेचवण्यासाठी तो इंग्रजीचा आधार घेतो. 
- एखादा अपवाद वगळता बऱ्याचवेळा तो त्याचा पहिला चॉइस नसतो. काही मराठी शब्द लोकांना समजायला अवघड जातात, म्हणून इंग्रजीचा आधार घेतला जातो.   
- ‘अ परफेक्ट मर्डर’साठी साऊथ मुंबईला गर्दी झाली. कारण हे शब्द तिथल्या मराठी माणसाच्या कानावर पडणारे आहेत. यातील भावना व्यक्त करण्याकरिता इंग्रजी टायटल्स ठेवली गेली आणि ती गाजली. 
- अलीकडच्या काळात इंग्रजी शब्द खूप प्रचलित झाल्याने चित्रपटांपासून वेबसीरिज आणि नाटकांपर्यंत बरीच टायटल्स इंग्रजी असतात.    

समाजात प्रचलित असणारी भाषा शिर्षकासाठी वापरली जाते. अलीकडच्या काळात मराठी भाषेतील इंग्रजी शब्दांचा वापर वाढल्याने त्यांचा प्रभाव मराठी नाटकांवरही दिसत आहे. बऱ्याचदा थ्रिलर्स किंवा काॅमेडी नाटकांची टायटल्स इंग्रजी असतात. ‘फॅमिली ड्रामा’सारख्या क्वचितच एखाद्या सामाजिक नाटकाचे टायटल इंग्रजी असते. - विजय केंकरे, दिग्दर्शक

नाटकाच्या शिर्षकातून आशय व्यक्त व्हायला हवाच; पण ते रसिकांचे लक्ष वेधून घेणारे असायला हवे. करमणूकप्रधान नाटकाला प्रचारकी शिर्षक देण्यात अर्थ नसतो. त्यामुळे प्रचलित शब्दांचा उपयोग करून शिर्षक ठरविली जातात. यासाठी शुद्ध भाषाच असायला हवी किंवा मराठीच शिर्षक हवे असा विचार लेखक, दिग्दर्शक करत नाहीत. नाटकाचा आशय आणि शैली लक्षात घेऊन आकर्षक शिर्षक दिले जाते. - चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

व्यावसायिकदृष्ट्या विचार करून नाटकाला शिर्षक दिले जाते. टायटल कॅची, लगेच रसिकांच्या ओठांवर येणारे आणि नाटकाला साधकबाधक असावे, हा पहिला विचार असतो. जाहिरातीच्या दृष्टीकोनातूनही टायटलचा विचार केला जातो. ‘फायनल ड्राफ्ट’आणि ‘लव्हबर्ड्स’ ही शिर्षके छोटी असल्याने जाहिरातीत चांगली वापरता आली. ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ ही कॅरेक्टर्सची नावे असल्याने तेच शिर्षक द्यावे लागले. - दिनू पेडणेकर, निर्माते, अनामिका.
 

Web Title: charm of english to marathi dramas more than half a dozen plays are entertaining the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक