चीनमधील चाहत्यांचं आमीर खानला खास गिफ्ट, "धाकड" गाण्यावर केला डान्स
By Admin | Published: July 8, 2017 05:39 PM2017-07-08T17:39:17+5:302017-07-08T17:39:17+5:30
दंगल" चित्रपटामुळे आमीर खान चीनमधील प्रत्येक घरात पोहोचला असून सर्वाचा आवडता अभिनेता ठरला आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - सिक्कीमवरुन सध्या भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही देशांमधील एक गोष्ट मात्र सर्वांच्या पसंतीस पडली आहे. ती म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान. "दंगल" चित्रपटामुळे आमीर खान चीनमधील प्रत्येक घरात पोहोचला असून सर्वाचा आवडता अभिनेता ठरला आहे. आमीरची क्रेझ इतकी वाढली आहे की, काही चाहत्यांनी चित्रपटातील "धाकड" गाण्यावर डान्स करत त्याला गिफ्ट दिलं आहे. एका फॅन क्लबने हा व्हिडीओ शूट केला असून व्हायरल होऊ लागला आहे.
आणखी वाचा -
दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये आमीरचे चाहते डान्स करत असल्याचं दिसत असून कुस्ती खेळतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आमीरला यापेक्षा चांगलं गिफ्ट मिळूच शकत नव्हतं असं वाटल्याखेरीज राहणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, डान्ससाठी जवळपास दोन आठवड्यांपासून ते सराव करत होते. तर व्हिडीओ शूट करण्यासाठी दोन दिवस लागले.
चीनमध्ये ‘श्वाई ज्याओ बाबा’ (लेट्स रेसल डॅड) नावाने दंगल चित्रपट तब्बल सात हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला. चित्रपट रिलीज झाल्यापासून चीनमध्ये तुफान कमाई करत असून सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत. 5 मे रोजी चीनमधील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या "दंगल" चित्रपटाने जगभरात तब्बल 301 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 1932 कोटींची कमाई केली आहे. या कमाईसोबत दंगलने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत. मात्र "दंगल"ने असा एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे, जो जगभरातील फक्त चार चित्रपटांना करणं शक्य झालं आहे.
जगभरात हॉलिवूड चित्रपटांचा दबदबा असून हे चित्रपट सर्वात जास्त कमाई करत असतात. मात्र फार कमी वेळा इंग्रजी भाषेत नसणारे चित्रपट इतकी मोठी कमाई करतात. अशा रितीने 300 मिलिअन डॉलर्सची कमाई करणारा "दंगल" जगभरातील पाचवा चित्रपट ठरला आहे. याआधी चीनमधील दोन, फ्रान्सचा एक आणि जपानाच्या एका चित्रपटाने हा रेकॉर्ड केला आहे. अशाप्रकारे या जागतिक विक्रम करणा-या चित्रपटांच्या यादीत "दंगल"ने पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
इंग्रजी भाषेत नसूनही जागतिक विक्रम करणारे पाच चित्रपट -
द मरमेड (चीन) 553 मिलिअन डॉलर्स
द इनटचेबलस (फ्रान्स) 427 मिलिअन डॉलर्स
मॉन्स्टर हंट (चीन) 386 मिलिअन डॉलर्स
योर नेम (जपान) 354 मिलिअन डॉलर्स
दंगल (भारत) 301 मिलिअन डॉलर्स