चिन्मय मांडलेकरला 'गालिब' नाटकासाठी मिळाला पुरस्कार, पत्नीने अभिमानाने शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 07:30 PM2024-04-25T19:30:00+5:302024-04-25T19:30:01+5:30
चिन्मयची पत्नी नेहाने नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहीत त्याचं कौतुक केलं आहे.
मराठी अभिनेताचिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) अभिनयासोबतच उत्तम लेखक, दिग्दर्शकही आहे. त्याचं 'गालिब' हे नाटक सध्या खूपच गाजतंय. चिन्मयनेच या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन केलं आहे. काल मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार सोहळा पार पडला. दरम्यान चिन्मय मांडलेकरला 'गालिब' नाटकासाठी मोहन वाघ उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिन्मयची पत्नी नेहाने (Neha Mandlekar) नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहीत त्याचं कौतुक केलं आहे.
मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव केला जातो. व्यासपीठावर चिन्मयने पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ शेअर करत पत्नी नेहाने लिहिले, "तू माझा नवरा आहेस याचा फक्त आणि फक्त अभिमान आहे. तुझ्यासारखा तूच चिन्मय. इतका विनय, इतकी विनम्रता हे सगळं तूच करु जाणे..."
या सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुड्डाला देण्यात आला.
चिन्मय मांडलेकर सध्या वेगळ्या कारणामुळेही चर्चेत आहे. लेकाचं नाव जहांगीर असल्या कारणावरुन त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याविरोधात चिन्मयची पत्नी नेहाने आधी व्हिडिओ शेअर करत राग व्यक्त केला. तर नंतर चिन्मयनेही व्हिडिओ शेअर करत यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असा निर्णय जाहीर केला. दरम्यान चिन्मयला हा पुरस्कार मिळाल्याने सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.