‘छोटी सरदारनी’चा अभिनेता अमल सहरावतच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, आईलाही लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:02 AM2020-07-26T10:02:45+5:302020-07-26T10:03:03+5:30
इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती
कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना या व्हायरसने विळखा घातला आहे. अशात टीव्ही अभिनेता अमल सहरावत याच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमलच्या आईला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
अमलने स्वत: ही माहिती दिली. गेल्या महिन्यात माझे वडिल राज बेल सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. माझ्या आईची टेस्टही दुस-यांदा पॉझिटीव्ह आली असल्याचे त्याने सांगितले.
सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, ‘डिअर इन्स्टाग्राम फॅमिली, काही दिवसांपासून तुम्हा लोकांच्या मॅसेजचे उत्तर देऊ शकलो नाही, त्याबद्दल माफी मागतो. गेल्या महिन्यात माझ्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. माझ्या आईची टेस्ट दोनदा पॉझिटीव्ह आली. माझ्या कुटुंबासाठी हा कसोटीचा काळ आहे. डॅड खूप सा-या आठवणी सोडून गेलेत. त्या आठवणी आम्हाला धीर देत राहतील. या काळात आम्हाला आधार देणा-या सर्वांचे मी आभार मानतो.’
कोरोनाची लक्षणे आढळल्यास पॅनिक होऊ नका. डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधा, असा सल्लाही त्याने पोस्टमध्ये दिला.
वडिलांच्या मृत्यूमुळे अमल कोलमडला आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, माझ्या वडिलांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. आम्ही वेगळ्याच आजारासाठी त्यांना रूग्णालयात घेऊन गेलो होतो. मात्र रूग्णालयात त्यांनी कोरोना टेस्ट झाली आणि ती पॉझिटीव्ह आली. यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. याचदरम्यान हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले. अमलने छोटी सरदारनी, रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम केले आहे.