चित्रपटसृष्टीकडून होतेय ‘हृदयांतर’चे कौतुक!

By Admin | Published: July 8, 2017 05:04 AM2017-07-08T05:04:21+5:302017-07-08T05:04:21+5:30

विक्रम फडणीस निर्मित-दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमाविषयी सध्या मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होतेय. या सिनेमाचा ट्रेलर २८ मे रोजी

Cinema is appreciated by 'heart-time'! | चित्रपटसृष्टीकडून होतेय ‘हृदयांतर’चे कौतुक!

चित्रपटसृष्टीकडून होतेय ‘हृदयांतर’चे कौतुक!

googlenewsNext

विक्रम फडणीस निर्मित-दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमाविषयी सध्या मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होतेय. या सिनेमाचा ट्रेलर २८ मे रोजी लाँच झाला. लाँच होताच सिनेरसिकांसोबतच बॉलिवूडनेही ट्रेलरची वाहवा करत सिनेमाविषयी उत्सुकता दाखवली. बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहरने ट्रेलरला भावुक आणि सुंदर ट्रेलर असे म्हटले तर अभिषेक बच्चननेही ट्रेलर ट्विट करून दिग्दर्शक विक्रम फडणीस यांना शुभेच्छा दिल्या.
बिपाशा बासूने विक्रम फडणीसच्या कलात्मकतेवरचा विश्वास दाखवत ‘तू हृदयाला भिडणारी एक सुंदर फिल्म बनवशील यावर नेहमीच विश्वास होता. तुझा मला गर्व वाटतो.’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
श्रद्धा कपूरने सोशल नेटवर्किंग साइटवरून शुभेच्छा देतानाच चक्क मराठीत आपला अभिप्राय नोंदवला होता. ती म्हणाली होती, ‘किती मस्त ट्रेलर आहे. खूपच छान. विक्रम तुला चित्रपटासाठी माया खुप शुभेच्छा.’
आता चित्रपट रिलीज होताना मराठी सेलिब्रिटीसुद्धा या सिनेमाचे कौतुक करताना दिसतायत. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकताच हा चित्रपट पाहिला. ती सांगते, ‘चित्रपट पाहताना विश्वासच बसत नव्हता की, विक्रम एक नवोदित दिग्दर्शक आहे. त्याने हा चित्रपट किती मनापासून बनवलाय, ते ही फिल्म पाहताना कळतं.’ दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी सांगतात, ‘विक्रम एक परिपक्व फिल्ममेकर असल्याचे ही फिल्म पाहताना मला जाणवले. मुक्ता-सुबोध-तृष्णिका-निष्ठाच्या तर तुम्ही प्रेमातच पडता. विक्रमने ही फिल्म उत्तम रीतीने लिहिली आणि दिग्दर्शित केलीय.’ निर्माते नितीन वैद्य सांगतात, ‘अतिशय सुंदर सिनेमा आहे. प्रत्येक फ्रेम पाहत राहण्यासारखी आहे. या सिनेमामुळे एका ताज्या दमाचा आणि कसलेला दिग्दर्शक मराठी सिनेसृष्टीला मिळालाय. हा सिनेमा पाहणे एक सुंदर अनुभव आहे.’ फिल्ममेकर गोविंद निहलानी प्रतिक्रिया देताना सांगतात, ‘ही एक हृदयाला भिडणारी फिल्म आहे. विक्रमने अतिशय कलात्मकरीतीने हा चित्रपट बनवला आहे. हा एक प्रगल्भ चित्रपट आहे. ‘निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर सांगतात, ‘विक्रम गेल्या अनेक वर्षांपासूनचा माझा चांगला मित्र आहे आणि त्याने अतिशय प्रामाणिकपणे ही फिल्म बनवलीय. मुक्ता आणि सुबोधही कायम आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेतून उत्तम आणि बहारदार अभिनयाने मंत्रमुग्ध करत असतात. या सर्वांमुळेच हा चित्रपट छान आकाराला आलाय.’ दिग्दर्शक समीर विद्वंस सांगतात, ‘ही एक अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कलाकृती आहे. चित्रपटातल्या दोन्ही छोट्या मुली तृष्णिका आणि निष्ठाने सुंदर अभिनय केलाय. मुक्ता-सुबोधचा यातला अभिनय तुम्हाला खिळवून ठेवतो. चित्रपटाचे पार्श्वसंगीतही माझ्या मनाला भिडले आणि या सगळ्याचे श्रेय मी दिग्दर्शक विक्रम फडणीस यांना देईन.’ बऱ्याच अवधीने मराठी सिनेमात ‘हृदयांतर’मुळे कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, वेशभूषा, कलादिग्दर्शन या सगळ्याच विभागांमध्ये भव्यता आणि कलात्मकतेची योग्य सांगड घातलेले सादरीकरण दिसून येतेय. गीतकार मंदार चोळकरच्या समृद्ध शब्दरचनेला संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी दिलेल्या सुमधुर चालीतून बनलेली पाच श्रवणीय गाणी हृदयांतरचे शक्तिस्थान आहे, अशी हृदयांतरची वाखाणणी सध्या अनेक सेलिब्रिटी करतायत.
टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ हा कौटुंबिक चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Cinema is appreciated by 'heart-time'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.