इतिहासाचा ‘वादग्रस्त’ अध्याय

By Admin | Published: November 25, 2015 02:23 AM2015-11-25T02:23:13+5:302015-11-25T02:23:13+5:30

‘इतिहास’ या विषयाचे आकर्षण... कुतूहल... हे चित्रपटकर्त्या मंडळींना नेहमीच राहिले आहे. आजच्या काळात चित्रपटांच्या काही कठीण जॉनर्सपैकी तो एक मानला जातो.

The 'controversial' chapters of history | इतिहासाचा ‘वादग्रस्त’ अध्याय

इतिहासाचा ‘वादग्रस्त’ अध्याय

googlenewsNext

‘इतिहास’ या विषयाचे आकर्षण... कुतूहल... हे चित्रपटकर्त्या मंडळींना नेहमीच राहिले आहे. आजच्या काळात चित्रपटांच्या काही कठीण जॉनर्सपैकी तो एक मानला जातो. त्यामुळेच कदाचित ऐतिहासिक कालखंडावर चित्रपट काढण्याचे धाडस म्हणावे तितकेसे झालेले नाही. मुळात इतिहास म्हटला की त्याविषयीचे वेगवेगळे मतप्रवाह समोर येतात, मग त्यातले खरे नि खोटे कोणते? याचे विचारचक्र प्रत्येकाच्या मनात सुरू होते. यासंदर्भात कित्येक इतिहासकार, थोर-जाणती मंडळी यांच्याशी चर्चा किंवा पुस्तकांमधल्या संदर्भांच्या अभ्यासानंतर एका निष्कर्षाला पोहोचणेदेखील तितकेसे सोपे नाही. यातच त्या काळातील भाषा, राहणीमान, सभोवतालची परिस्थिती यांची सांगड घालणंही तसं मुश्कीलच! म्हणूनच ‘ऐतिहासिक’ कालखंड... घटना यांचा परामर्श चित्रपटाच्या माध्यमातून घेणे आणि तोही अचूक संदर्भाचा वेध घेत, ही तशी दिग्दर्शकांसाठी अशक्यप्राय गोष्टच ठरते. पण हे शिवधनुष्य अनेक निर्माता आणि दिग्दर्शकांनी अचूकपणे पेलले आहे, त्यातूनच भारतातील ऐतिहासिक घडामोडींचा जाज्वल्य इतिहास प्रेक्षकांसमोर उभा राहिला आहे.
अगदी ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटापासून ते हरिश्चंद्राची फॅक्टरी, अजिंठा, संदूक, विटी दांडू, लोकमान्य - एक युगपुरुष, नीळकंठ मास्तरपर्यंत ही मालिका चालत आलेली आहे. त्यामध्ये मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या चित्रपटाचासुद्धा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हिंदीमध्येदेखील अशा ऐतिहासिक कलाकृती निर्माण करण्याची भुरळ दिग्दर्शक-निर्मात्यांना पडली नसेल तरच नवल! त्यामध्ये मग शाहरूख खानचा सम्राट अशोक, हृतिक रोशन-ऐश्वर्या रॉयचा जोधा-अकबर असो किंवा संजय लीला भन्साली यांचा प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला ‘बाजीराव-मस्तानी’ असो! एखाद्या कोणत्याही ऐतिहासिक विषयांवर चित्रपट काढण्यापूर्वी त्यांचे संदर्भ तपासणे हे फार मोठे जिकिरीचे काम असते, त्यातला एकही संदर्भ चुकला तर पूर्ण इतिहासच बदलला जाऊ शकतो. त्यामुळे अचूकतेसाठी त्या काळातील वातावरण... पेहराव... साधनं... याच्यावर लक्ष केंद्रित करावे लागते. यासाठी दिग्दर्शक काही प्रमाणात ‘सिनेअभिव्यक्ती’ स्वातंत्र्य घेतातही; ज्यामध्ये गैर असे काहीच नाही... मात्र असे स्वातंत्र्य घेताना मूळ अभिव्यक्तीला कोठेही छेद बसणार नाही, याची काळजीही दिग्दर्शकांनी घेणे आवश्यक ठरते, आता हेच पाहा ना, जोधा-अकबरमध्येही काही चुकीचे संदर्भ दाखविल्यामुळे चित्रपटाला वादाला सामोरे जावे लागले होते. दूरचित्रवाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘झाँसी की रानी’ या मालिकेनेदेखील वादंग ओढवून घेतले होते.
आता ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटामध्येही भन्साली यांनी नको तेवढे सिनेस्वातंत्र्य घेतल्यामुळेच इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत... बाजीराव पेशवे, काशीबाई आणि मस्तानी या त्रिकूटाभोवती कथानकाची गुंफण करताना चक्क काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्रितपणे ‘पिंगा’ घालताना दाखवून भन्साली यांनी इतिहासप्रेमींचा रोष नकळतपणे ओढवून घेतला आहे... या चित्रपटाला विरोध करणाऱ्या कमेंटचा पाऊस सोशल मीडियावर दिवसागणिक बरसत आहे. तर फेसबुकवर ‘बॅन द मूव्ही बाजीराव-मस्तानी’ हे पेज सुरू करण्यात आले आहे. बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनी हे गाणे चित्रपटातून वगळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनदेखील दिले आहे. त्यामुळेच प्रदर्शनाच्या आधीच ही ऐतिहासिक कलाकृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र दिग्दर्शकांच्या सिनेअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नव्या पिढीपुढे चुकीचे संदर्भ पोहोचू नयेत, यासाठीच इतिहासप्रेमींनी हा लढा उभारला आहे, ज्यात गैर असे काहीच नाही!
’’अठराव्या शतकातली सामाजिक परिस्थिती पाहता, काशीबाई-मस्तानी यांनी एकत्रित येऊन नृत्य केल्याचा कुठेही संदर्भ नाही. गोकुळाष्टमीच्या दिवशी पेशवे कुटुंबासमोर मस्तानीने नृत्य केले, त्या वेळी तिथे काशीबाई उपस्थित होत्या, असा एक संदर्भ आढळतो. मात्र तो विश्वसनीय पुरावा म्हणता येणार नाही. मुळात बाजीराव पेशवे हे खूप मोठे योद्धा होते. त्यांचे कार्य केवळ ‘बाजीराव-मस्तानी’ विषयापुरतेच मर्यादित नाही, हे समजले पाहिजे. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय दाखविले आहे, हे आधी पाहायला हवे. ते पाहिल्यानंतरच चित्रपटाचे योग्य मूल्यमापन करता येईल.
- पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ज्ञ
ऐतिहासिक विषयांवर चित्रपट निर्मिती करताना दिग्दर्शकांनी खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे. संजय लीला भन्साली यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. कोणत्याही दिग्दर्शकाचा नायकाची निंदा करण्याचा हेतू नसतो. मुळात असे किती लोक आहेत ज्यांना आपला इतिहास व्यवस्थित माहीत आहे. ‘पिंगा’ या एका गाण्यावरून ओव्हर रिअ‍ॅक्ट व्हायची आवश्यकता नाही. हे गाणे कदाचित त्यांच्या स्वप्नामधलेदेखील असू शकते आणि ते चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. त्याआधीच विरोध करणे चुकीचे आहे. एक मात्र आहे, या गाण्यात दोघींनीही शालीन पद्धतीने नऊवारी साडी परिधान केलेल्या नाहीत. जे आपण नक्कीच मान्य करू शकतो.
- मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री-दिग्दर्शिका
कोणत्याही ऐतिहासिक विषयावर चित्रपटाची निर्मिती करताना त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘नीळकंठ मास्तर’ करताना तो विषय पडद्यावर आणण्यासाठी मी खूप वाचन केलं. जे डोळ्यांसमोर येतं ते हुबेहूब जोपर्यंत पडद्यावर उभं राहत नाही तोपर्यंत ते वातावरण तयार होत नाही व प्रेक्षकांना तो चित्रपट भावणार नाही. त्या वातावरणनिर्मितीसाठी त्या प्रकारचे कपडे, पेहराव आवश्यक असतो. म्हणूनच दिग्दर्शकाला खूप खबरदारी घ्यावी लागते.
- गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक

Web Title: The 'controversial' chapters of history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.