‘मिस टनकपूर’ला थंड प्रतिसाद
By Admin | Published: June 30, 2015 01:09 AM2015-06-30T01:09:47+5:302015-06-30T01:09:47+5:30
पत्रकारितेतून चित्रपट दिग्दर्शक बनलेल्या विनोद कापरी यांचा सामाजिक व्यवस्थेवर ताशेरे ओढणाऱ्या ‘मिस टनकपूर हाजीर हो’ चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला.
पत्रकारितेतून चित्रपट दिग्दर्शक बनलेल्या विनोद कापरी यांचा सामाजिक व्यवस्थेवर ताशेरे ओढणाऱ्या ‘मिस टनकपूर हाजीर हो’ चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला. पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणातील प्रभावशाली खाप पंचायत आणि तेथील सामाजिक मुद्द्यांवर बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही. रिलीज झाल्यापासून तीन दिवसांत देशभरातील थिएटरमधून या चित्रपटाने केवळ एक कोटीच्या घरात कमाई केली आहे. या कमाईतही सत्तर टक्क्यांहून अधिक हिस्सा दिल्ली आणि उत्तर भारतातील राज्यांचा राहिला. उर्वरित भागात मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकाला हा चित्रपट आवडेल, असे मानले जात होते; मात्र असे झाले नाही. मुंबईतही हा चित्रपट चालला नाही.
व्यापार जाणकारांच्या मते, सामाजिक विषयांवरील चित्रपटांकडून अधिक अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे याच्या अपयशाबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. यासोबतच रिलीज झालेल्या ‘युवा’ चित्रपटाची परिस्थिती पहिल्याच दिवशी अत्यंत वाईट राहिली. अनेक चित्रपटगृहांना ‘युवा’ मागे घ्यावा लागला.
बॉक्स आॅफिसवर या वेळी वरुण धवन आणि श्रद्धा कपूर या जोडीच्या ‘एबीसीडी २’ची चलती आहे. पहिल्या आठवड्यात म्हणजे रिलीज झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन दिवसांत ४६ कोटी रुपयांच्या शानदार ओपनिंगनंतर आठवडाअखेरपर्यंत ७१ कोटी रुपयांची कमाई केली होती. आतापर्यंत म्हणजे १० दिवसांत या चित्रपटाने ८८ कोटी रुपयांची उलाढाल केली असून आगामी काळात हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यंदा १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा दुसरा चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या कंगनाच्या ‘तनू वेड्स मनू रिटर्न’ या चित्रपटाने १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविण्यात यश प्राप्त केले होते.
बॉक्स आॅफिसवरील इतर चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर, महेश भट्ट कंपनीतील मोहित सुरी यांच्या लव्ह ट्रँगलवर तयार झालेल्या ‘हमारी अधुरी कहानी’ची कमाई ३३ कोटींवर आली आहे. या चित्रपटाकडून यापेक्षा अधिक कमाईची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ची कमाईही ७६ कोटींवर आली आहे. कंगनाच्या ‘तनू वेड्स मनू रिटर्न’ने आतापर्यंत १४९ कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट दीडशे कोटींच्या घरात जाईल.
येत्या शुक्रवारी जॉली एलएलबी बनविणारे दिग्दर्शक सुभाष कपूर यांचा ‘गुड्डू रंगीला’ चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट वादग्रस्त गाण्यांनी चर्चेत असून प्रमोशनकडे दुर्लक्ष झाले आहे. अर्शद वारसी याने या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका केली आहे.