बॉलिवूडमध्ये ‘दरार’

By Admin | Published: October 20, 2016 02:13 AM2016-10-20T02:13:28+5:302016-10-20T02:13:28+5:30

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीचे पडसाद बॉलीवूडमध्ये बघावयास मिळत आहेत

'Crack' in Bollywood | बॉलिवूडमध्ये ‘दरार’

बॉलिवूडमध्ये ‘दरार’

googlenewsNext


उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीचे पडसाद बॉलीवूडमध्ये बघावयास मिळत असून, सध्या कलाकारांमध्ये शाब्दिक युद्धामुळे ‘दरार’ निर्माण झाली आहे. अनुराग कश्यप यांच्या टिवटिवाटामुळे तर आगीत तेल ओतल्यासारखे झाल्याने येत्या काळात हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. तर, हा वाद सर्वसामान्य भारतीयांशी निगडित असल्याने कलाकारांचे एक वादग्रस्त वक्तव्य काळजाला ठेच पोहोचविणारे ठरत आहे. याचे परिणाम म्हणून सोशल मीडियावर सध्या पाक कलाकारांबाबत पुळका दाखविणाऱ्या बॉलीवूड स्टार्सचा नेटिझन्सकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. याच अनुषंगाने घेतलेला आढावा...
इम्पाने पाक कलाकारांवर घातलेली बंदी आणि मनसेने त्यांना दिलेला अल्टिमेटम लक्षात घेऊन सर्व पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून काढता पाय घेतला; परंतु त्यांच्यावर घातलेल्या बंदीचा निर्णय काही बॉलिवूड कलाकारांच्या चांगलाच जिव्हारी लागला. वादाशी जणू काही जवळीक निर्माण केलेल्या सलमान खानने अपेक्षेप्रमाणे सर्वांत अगोदर यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, की ‘पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत. त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणे योग्य नाही. हे कलाकार जेव्हा भारतात येतात, तेव्हा त्यांना व्हिसा कोण देत? मग त्यांनी भारतात का थांबायचं नाही?’ असे प्रश्न त्याने उपस्थित केले.
सलमानच्या या प्रतिक्रियेनंतर वाद निर्माण होत असतानाच अक्षयकुमार व अजय देवगण यांनी पाक कलाकारांवरील बंदीचे समर्थन केले. अक्षयने सर्व भारतीयांनी आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले, तर अजय देवगण याने पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. हा वाद इथवरच थांबला नाही, तर महेश भट, ओम पुरी, करण जोहर, प्रियंका चोप्रा, राधिका आपटे, वरुण धवन आणि आता अनुराग कश्यप यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेऊन ‘कलाकार हे शांतीचा संदेश घेऊन येत असतात, त्यांच्यावरील बंदी पूर्णत: चुकीची असल्याचे’ म्हटले.
करण जोहर याला तर पुळका येणे स्वाभाविक होते. कारण त्याचा आगामी ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपट फवाद खान या पाक कलाकारामुळे अडचणीत आल्याने त्याचा बंदीला विरोधाचा सूर आजही कायम आहे. करण जोहरची पाठराखण करण्यासाठी प्रियंका चोप्रा, राधिका आपटे याही मैदानात उतरल्या आहेत. राधिका म्हणाली, की ‘जर स्वॅच कंपनीची परदेशी घड्याळं भारतात येऊ शकतात, तर पाकिस्तानी कलाकार का नाही? त्यांनाही भारतात येऊन सिनेमा करण्याची परवानगी मिळायला हवी. त्यांच्यावरची बंदी उठवली पाहिजे.’ तर, प्रियंकाने, ‘प्रत्येक वेळी कलाकरांनाच का टार्गेट केले जाते?’ असा सवाल उपस्थित करून पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले.
अर्थात पाक कलाकारांच्या बाजूने उभे राहिलेल्या या कलाकारांना जशास तसे उत्तर इतर बॉलिवूड स्टार्सनीच दिले. नेहमीच महत्त्वपूर्ण विषयावर वैचारिक मत मांडणाऱ्या अभिनेता रणदीप हुडा याने ‘पाकिस्तानची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर आपण कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे सांस्कृतिक पातळीवरही बहिष्कार घालणे तितकेच आवश्यक असल्याचे’ मत व्यक्त करून पाक कलाकारांची बाजू घेणाऱ्यांचा समाचार घेतला. पुढे सिंगल स्क्रीनमालकांनी पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट दाखविणार नसल्याचे स्पष्ट केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.
यात अनुराग कश्यप याने भर घालून बॉलिवूडमध्ये अक्षरश: दरार निर्माण केली आहे. अनुरागने नेहमीच्याच ट्विट या अस्त्राचा वापर करीत करण जोहरची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. असे करताना त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केल्याने सध्या ‘बॉलिवूड विरुद्ध बॉलिवूड’ असा सामना रंगला आहे. गेल्या रविवारी त्याने ट्विट करून म्हटले होते, की ‘अनंत समस्यांचा सामना करून आम्ही चित्रपट बनवत असतो. अशात त्यावर बंदी घातली जात असेल, तर आमचे नुकसान होणारच. खरं तर जेव्हा करण जोहर ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाचे शूटिंग करीत होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाझ शरीफ यांना लाहोर येथे भेटायला गेले होते. त्यांनी अजूनपर्यंत देशाची माफी का मागितली नाही?’ असा सवाल उपस्थित केला होता.
अनुराग कश्यप याच्या ट्विटनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली. यावर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी तातडीने प्रतिक्रिया देताना म्हटले, की ‘मोदींवर टीका करणे हा ट्रेंड बनला आहे. अनुराग कश्यपचे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे.’ भाजपा खासदार तथा अभिनेता परेश रोवल यांनी त्यांच्या खास शैलीत अनुराग कश्यप याच्यावर पलटवार केला. श्रीकृष्णाचा दाखला देताना ते म्हणाले, की ‘जेव्हा श्रीकृष्ण युद्धाच्या अगोदर हस्तिनापूर येथे शांतिदूत बनून गेले होते, तेव्हा त्यांना कोणी माफी मागायला लावली नाही, हे नशीब!’ तर शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनीही अनुराग कश्यप याला खोटे ठरवत त्याने केलेली टीका चुकीची असल्याचे म्हटले. अनुरागच्या या टिवटिवाटानंतर आणखीही बरेचसे कलाकार या शाब्दिक युद्धात उतरत आहेत.
मात्र काहीही असो, बॉलिवूडमध्ये निर्माण होत असलेली दरार चिंताजनक असून, कलाकारांमध्ये नसलेली एकजूट देशहितासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे. कलाकारांचा हा वाद सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चिला जात असून, देशाच्या सार्वभौमत्त्वाच्या दृष्टीने त्यांच्यात एकी असणे गरजेचे असल्याचा विचार पुढे येत आहेत. त्याचबरोबर, सर्व कलाकारांनी भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असायला हवे, अशा आशयाच्या पोस्टही नेटिझन्सकडून शेअर केल्या जात आहेत.

Web Title: 'Crack' in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.