विखुरलेल्या सोंगट्यांचा डाव!

By Admin | Published: August 20, 2016 02:34 AM2016-08-20T02:34:53+5:302016-08-20T02:34:53+5:30

लहान मुलांमध्ये चोर-पोलिसाचा खेळ रंगतो, तेव्हा त्यांच्यात चोर कोण आणि पोलीस कोण असणार हे अगोदरच ठरलेले असते. मुलांचा हा डाव केवळ त्या खेळापुरता मर्यादित राहतो; पण हाच खेळ

Dangers of scattered songs! | विखुरलेल्या सोंगट्यांचा डाव!

विखुरलेल्या सोंगट्यांचा डाव!

googlenewsNext

- राज चिंचणकर

मराठी चित्रपट - चौर्य

लहान मुलांमध्ये चोर-पोलिसाचा खेळ रंगतो, तेव्हा त्यांच्यात चोर कोण आणि पोलीस कोण असणार हे अगोदरच ठरलेले असते. मुलांचा हा डाव केवळ त्या खेळापुरता मर्यादित राहतो; पण हाच खेळ जर मोठ्यांच्यात रंगला तर त्याची व्याख्या पार बदलते. ‘चौर्य’ चित्रपटाने पटावरच्या सोंगट्यांचा वापर करत असाच एक डाव खेळला आहे; परंतु तो पूर्णत्वास नेताना मात्र या सोंगट्या विखुरल्या गेल्या आहेत.
या चित्रपटाचे कथानक तसे छोटे आहे. देवमाळ नामक गावातल्या घरांना दरवाजे लावण्याची पद्धत नाही; कारण चौर्यकर्म करणाऱ्यांना देव शिक्षा करतो यावर गावकऱ्यांची श्रद्धा आहे. मात्र एक दिवस या गावातल्या देवळाच्या तिजोरीवरच दरोडा पडतो आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेला तडा जातो. दरोडा टाकणारे चोर हे पोलिसांच्या वेषात होते असे उघडकीस येते आणि या घटनेबाबत कुतूहल निर्माण होते. कोण चोर आणि कोण पोलीस याचा माग काढत आणि मुखवट्यामागचे चेहरे हुडकून काढत हा डाव खेळला जातो.
कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळणाऱ्या समीर आशा पाटील यांनी वास्तवातला संदर्भ घेत एक वेगळा विषय या चित्रपटात हाताळला आहे. अंधाराशी सलगी आणि उजेडाचे भय, अशा संकल्पनेवर रेंगाळणाऱ्या या चित्रपटात देव, धर्म, श्रद्धा आणि श्रद्धेचा बाजार असे मुद्दे ओघाने आले आहेत. त्यांचे सादरीकरण ठोस आहे; परंतु ते पूर्णत: खिळवून मात्र ठेवत नाही. याचे एक कारण म्हणजे हा संपूर्ण चित्रपट प्रामुख्याने लांबलचक अशा एका ‘सीन’मध्ये घडतो. अर्थात तशी गरज विषयानुरूप त्यांनीच निर्माण करून ठेवली आहे. पण त्यामुळे रंजकतेत तो दोन पावले मागे पडतो. व्यक्तिरेखा ठसठशीत करण्याच्या प्रयत्नात पटकथेकडे मात्र अंमळ दुर्लक्ष झाले आहे. असे असले, तरी दिग्दर्शकाने व्यक्तिरेखांवर घेतलेली मेहनत जाणवते आणि कलाकारांनीही त्यांना चांगली साथ दिल्याचे स्पष्ट होते. या चित्रपटातल्या व्यक्तिरेखांना मुळातच नावे असण्याची गरज नाही; इतके त्यांचे काम ठळक आहे. पण एवढे सगळे असूनही शेवटी हाती फारसे काही लागत नाही. हा चित्रपट म्हणजे प्रायोगिकतेची कास धरत बनवलेली एखादी नाट्यकृती असावी असा भास अधूनमधून होत राहतो.
खास निवडलेल्या लोकेशन्सवर श्रीशैल हिरेमठ व जितेंद्र पंडित यांचा कॅमेरा तितक्याच नजाकतीने फिरला आहे. त्यामुळे चित्रपटात रखरखीतपणा असला, तरी तो पडद्यावर चांगला दिसतो. यातली गाणीसुद्धा विषयाला धरून आहेत, त्यामुळे ती अवास्तव वाटत नाहीत. ध्वनी आरेखनाचे चांगले काम या चित्रपटात झाल्याचे दिसून येते. अभिनयाच्या पातळीवर मिलिंद शिंदे (इसम), दिग्विजय रोहिदास (चालक), दिनेश लता शेट्टी (शिवा) व तीर्था मुरबाडकर (बाई) या प्रमुख व्यक्तिरेखांनी चांगली अदाकारी पेश केली आहे. प्रदीप वेलणकर, किशोर कदम, गणेश यादव, जयेश संघवी, गणेश पाणपट, आरजे श्रुती यांची कामगिरी ठीक आहे. एकूणच, निव्वळ करमणूक टाळून एका वेगळ्या विषयाची मांडणी अनुभवायची असेल, तर मात्र ‘चौर्य’ हा त्यावर उपाय असू
शकतो.

Web Title: Dangers of scattered songs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.