२०० किलो वजनाच्या पेहलवानाला रिंग बाहेर फेकणारे दारा सिंह कसे झाले रूस्तम-ए-हिंद?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:12 PM2018-07-11T12:12:48+5:302018-07-11T12:15:32+5:30
दारा सिंह यांच निधन ८३ वयाचे असताना १२ जुलै २०१२ मध्ये झालं होतं. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. चला जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...
मुंबई : प्रसिद्ध पहेलवान आणि अभिनेते दारा सिंह यांनी जगभरात भारताचं नाव मोठं केलं. ते एक अभिनेते होण्याआधी एक जगप्रसिद्ध पेहलवान होते. त्यांनी जवळपास ५०० कुस्त्यांमध्ये लगोपाठ विजय मिळवत जगाला आपल्या मुठीत केले होते. दारा सिंह यांच निधन ८३ वयाचे असताना १२ जुलै २०१२ मध्ये झालं होतं. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. चला जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...
दारा सिंह यांचं पूर्ण नाव फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचं पूर्ण नाव दारा सिंह रंधावा असं होतं. त्यांचा जन्म १९२८ मध्ये पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला होता. दारा सिंह यांना बालपणापासून कुस्तीची आवड होती. त्यांनी सर्वातआधी १९४७ मध्ये सिंगापूरमध्ये मलेशियाचा चॅम्पियन तरलोक सिंह याला मात देत आपला विजयी प्रवासाला सुरुवात केली होती.
१९५४ मध्ये दारा सिंह यांनी भारतीय कुस्ती चॅम्पियनशिपचा किताब मिळवला होता. त्यानंतर ते कॉमनवेल्थ चॅम्पियन सुद्धा झाले. पण दारा सिंह यांचं नाव निघताच आठवते ती वर्ल्ड चॅम्पियन किंग कांगसोबत केलेली कुस्ती. या यादगार मुकाबल्यानंतर दारा सिंह सुपरस्टार झाले होते. असे सांगितले जाते की, साधारण २०० किलो वजनाच्या किंग कांगला दारा सिंह यांनी उचलून रिंगबाहेर फेकलं होतं. किंग कांगला मात दिल्यानंतर गारा सिंह यांना 'रूस्तम ए हिंद' चा दर्जा मिळाला, हा एक असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत दुसरं कुणीही करू शकलं नाही.
दारा सिंह यांनी साधारण ५०० कुस्ती केल्या आणि त्यात विजय मिळवला. १९८३ मध्ये ५५ वर्षांचे असताना त्यांनी कुस्तीतून सन्यास घेतला. आयुष्यातील साधारण ३६ वर्ष त्यांनी कुस्ती केली. आपल्या या अजिंक्य असण्यासाठी दारा सिंह यांचं नाव ऑब्जर्वर न्यूज लेटर हॉल ऑफ फेम मध्येही नोंदवलं गेलं आहे.
पेहलवानी सोबतच दारा सिंह यांनी सिनेमातही काम केलं. अॅक्शन हिरो म्हणून अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांना देशातील पहिला हिमॅन म्हटले जाऊ लागते होते. त्यांचा पहिला सिनेमा 1952 साली आलेला 'संगदिल' हा होता.
दारा सिंह यांनी एकूण ११५ सिनेमांमध्ये काम केले. दारा सिंह हे 'रामायण' या मालिकेत केलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळेही लोकप्रिय झाले होते. आजही त्यांना हनुमान म्हणून ओळखले जाते. सिनेमांसोबतच ते राजकारणातही होते. ते २००३ ते २००९ या काळात राज्यसभेचे सदस्यही होते.