गहिऱ्या थरारनाट्याचा रंगतदार प्रयोग!
By Admin | Published: July 11, 2015 10:41 PM2015-07-11T22:41:44+5:302015-07-11T22:41:44+5:30
सस्पेन्स, थ्रीलर, मर्डर मिस्ट्री असे विषय मराठी रंगभूमीला नवीन नाहीत; पण तरी असा एखादा विषय नव्याने आला, तर रंगमंचाच्या अवकाशात त्याची नाविन्यपूर्ण मांडणी कशी करण्यात
- राज चिंचणकर
नाटक : तळ्यात मळ्यात
सस्पेन्स, थ्रीलर, मर्डर मिस्ट्री असे विषय मराठी रंगभूमीला नवीन नाहीत; पण तरी असा एखादा विषय नव्याने आला, तर रंगमंचाच्या अवकाशात त्याची नाविन्यपूर्ण मांडणी कशी करण्यात आली आहे यावर त्या नाट्यकृतीचा पुढचा खेळ अवलंबून राहतो. या खेळाच्या मांडणीत नवे काय आणि ते त्या मांडणीला किती पोषक आहे, याची सांगड घालत तो विषय हाताळला जातो. हा एक प्रकारचा नवा प्रयोगच असतो आणि तळ््यात मळ््यात या नाटकाने असाच एक प्रयोग बांधला आहे. विशेष म्हणजे, हे नाटक तळ््यात किंवा मळ््यात अशी दुटप्पी भूमिका न घेता हा प्रयोग ठोसपणे रंगवत जातो. त्यादृष्टीने या नाटकाचे सादरीकरण खिळवून ठेवते आणि गहिरेपण जपत थरारनाट्याचा रंगतदार प्रयोग रंगमंचावर रंगलेला दिसतो.
रहस्य हाच ज्याचा पाया आहे, त्याची गोष्ट सांगणे म्हणजे त्या रहस्याची उकल करण्यासारखे ठरेल. मग त्यातून मिळू शकणारे अनपेक्षित धक्के सर्वसाधारण पातळीवर येऊन पोहोचण्याची शक्यताच अधिक! परिणामी या नाटकाची गोष्ट उघड करण्यात हशील नाही, त्यामुळे नाटकाचे सूत्र थोडक्यात मांडावे लागेल. अश्विन हा एक लेखक आहे; म्हणजे निदान त्याची पत्नी नीलिमा हिला तरी तो तेच सांगतो. त्याचे व्यक्तिमत्त्व बुळचट अशा प्रकारात मोडत असले, तरी नीलिमा आॅफिसला गेल्यावर मात्र अश्विनमधला लेखक व त्याचा बुळचटपणा पार गायब होऊन त्याची जागा राज नामक एक तडफदार व्यक्तिमत्त्व घेते. या त्याच्या व्यक्तिमत्त्वाला स्वीटी नामक तरुणीची भक्कम साथ आहे. त्यांच्या या गोष्टीत पुढे सायमन, रॉबर्ट, जेनी, लोबो अशा काही पात्रांची भर पडत जाते. अश्विनचा होणारा कायापालट असो, नीलिमाचा शिजत असलेला वेगळाच डाव असो किंवा स्वीटीचे यातल्या नायकाशी असलेले लागेबांधे असोत; नाटकातला सस्पेन्स वाढता ठेवण्याचे काम हा प्रयोग सतत करतो. यात येणारे अंकांचे संदर्भ, अनाहूतपणे प्रकट होणारी पात्रे, अश्विन आणि नीलिमा या दोघांमध्ये स्वीटी या व्यक्तिरेखेचा पात्राचा करून घेतलेला चपखल उपयोग आणि नाट्याला शेवटी मिळणारी कलाटणी ठाशीवपणे दृश्यमान करत एक अनोखा विषय हे नाटक गुंफत जाते.
अश्विन, नीलिमा व स्वीटी या तिघांमध्ये असलेले नाते आणि त्यांना इतर पात्रांची मिळणारी साथ याने या नाटकाचे जोडकाम उत्तम केले आहे. अभिजीत गुरु याने हे नाटक लिहून त्यानेच दिग्दर्शितही केले आहे आणि अश्विनची भूमिकासुद्धा त्यानेच साकारली आहे. संहितेत असलेली रहस्यमय गुंफण त्याने तितक्याच ताकदीने रंगभूमीवर सादर केली आहे. मात्र यात येणारे धक्के अधिक जोरकस उतरायला हवे होते. काहीवेळा यातल्या धक्कातंत्राचा अंदाज आधीच लागत असल्याचे सूचित होते, त्यामुळे थरारनाट्यात आवश्यक असलेला धक्का सहज सहन करण्याच्या पातळीवर येतो. पण तरीही नाटकाचा एकूणच डोलारा सांभाळताना लेखक व दिग्दर्शक म्हणून अभिजीतची झालेली कामिगरी चांगली आहे. शेवटी एका फलकावर येऊन पोहोचणारा नाटकाचा अंतिम चरण हटके आहे.
या नाटकात दुहेरी व्यक्तिमत्त्व साकारताना अभिजीतने सांभाळलेले व्यवधानही प्रकर्षाने लक्षात येते. दोन व्यक्तिरेखांमधला सूक्ष्म फरक त्याने ताकदीने मांडला आहे. अमृता संत हिने यात तारेवरची वेगळीच कसरत करत जगणारी नीलिमा संहितेबरहुकूम साकारली असून तिची कामिगरी भन्नाट आहे. तिची उत्तम संवादफेक आणि देहबोलीचा अचूक वापर करण्याचे तिचे कसब यातून तिची नीलिमा नाटकात ठसत जाते. समिधा गुरु हिने स्वीटी टेचात रंगवली आहे आणि यासाठी तिने तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अचूक वापर करून घेत या पात्रासाठी असलेला प्रगल्भपणा तिच्या वावरातून उत्तम पेश केला आहे. यात बहुरंगी भूमिका करणारा चिन्मय पाटसकर, तसेच राजन बावडेकर या कलावंतांची चांगली साथ प्रमुख कलावंतांना मिळाली आहे. विजय कोळवणकर यांचे नेपथ्य नाटकाला पूरक आहे; मात्र रहस्यमय बाज असलेल्या नाटकात त्याचा अजून चांगला उपयोग करून घेता येणे शक्य होते. शिवदर्शन साबळे यांचे पाशर््वसंगीत नाटकाचा आशय अधिक गडद करते आणि भूषण देसाई यांची प्रकाशयोजना यातल्या थराराला गहिरा अर्थ प्राप्त करून देते. एकूणच, पदोपदी उत्कंठा वाढवत आणि खुर्चीला खिळवून ठेवण्याची कामिगरी बजावत एक हटके अनुभव मिळण्याची खात्री हे नाटक आवर्जून देते.