गडद पिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 02:06 AM2016-09-17T02:06:56+5:302016-09-17T02:06:56+5:30

पिंक हे नाव अतिशय दिशाभूल करणारे आहे. साधारणत: पिंक हा रंग खूप हलका, साधा, क्षुल्लक आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपटदेखील हलकाफुलका असावा असे वाटते

Dark pink | गडद पिंक

गडद पिंक

googlenewsNext

जान्हवी सामंत
पिंक हे नाव अतिशय दिशाभूल करणारे आहे. साधारणत: पिंक हा रंग खूप हलका, साधा, क्षुल्लक आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपटदेखील हलकाफुलका असावा असे वाटते. पण त्याच्या सादरीकरणात हा चित्रपट अतिशय ग्रे आणि गंभीर स्वरूपाचा बनला आहे.
पिंक ही मिनल (तापसी पन्नू), फलक (कीर्ती कुलहारी) आणि अँड्रिया (अँड्रिया टॅरिंग) या तीन मुलींची कथा आहे. ते पेइंग गेस्ट म्हणून एका घरात राहत असतात. एका हिंसक प्रसंगात ते ओढले जातात. त्यांची काही लोकांसोबत प्रचंड हाणामारी होते आणि त्यातील एकाला गंभीर दुखापत होते. पण यानंतर दोघेही पोलिसांमध्ये जाऊन याची तक्रार नोंदवत नाहीत. ज्यांच्यासोबत या मुलींची भांडणे होतात, त्या मुलांचे राजकीय नेत्यांशी संबंध खूप चांगले असतात. त्यामुळे या मुलींचा प्रचंड छळ केला जातो, दहशतीचे वातावरण निर्माण केले जाते. या घटनेनंतर त्यांनी घर सोडावे असा दबाव त्यांचा घरमालक त्यांच्यावर टाकतो. एका मुलीवर नोकरी सोडायलाही दबाव टाकला जातो. तर एका मुलीचा सतत पाठलाग केला जातो. तसेच तिचा विनयभंगही केला जातो. पोलीस त्यांची तक्रार घेण्यासाठीही तयार होत नाही. खऱ्या आयुष्यात मुलींचा छळ कसा होऊ शकतो हे या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटाच्या कथेत अनेक विसंगती आहेत. काही दृश्ये तर आपल्या तर्काच्या खूपच पलीकडच्या आहेत. फलकच्या फोटोशोप केलेल्या फोटोंमुळे तिला तिची नोकरी सोडावी लागते ही गोष्ट न पटणारी आणि उगाचच चित्रपटात टाकल्यासारखी वाटते. मिनलचा विनयभंग होणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. पण याची नंतरच्या कोणत्याच दृश्यात चर्चा होताना दिसत नाही की त्याचा संदर्भही नंतर चित्रपटात नाहीये. तसेच सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये बच्चन यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना संभ्रमित करणारी वाटते. अमिताभचे एका महिलेसोबत असलेले रहस्यमय नाते आणि त्यांची मानसिक अवस्था या दोन्ही गोष्टींचे चित्रपटात काहीच नाते जुळत नाही. मुलींचा सगळ्यांचा अभिनय अजून चांगला होऊ शकला असता. घाबरलेल्या मुलीचा अभिनय करणे हे तापसी पन्नूच्या अभिनय कुवतीच्या पलीकडे आहे. पण कीर्तीचा अभिनय चांगला आहे. अँड्रिनाला चित्रपटात करण्यासारखे तसे काहीही नाहीये. अमिताभ यांनी नेहमी आपल्या विचारात मग्न असलेल्या वकिलाची भूमिका साकारली आहे. खरे तर ही भूमिका तीन या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसारखीच आहे. पण तीनच्या भूमिकेपेक्षा या चित्रपटात त्यांची भूमिका अधिक रेखीव आहे.
चित्रपट पाहताना पुढे काय होणार आहे याची आधीच कल्पना येते. काही गोष्टी वगळल्या तर कथानकात आपण विचार केल्यापेक्षा काहीच वेगळ्या गोष्टी घडत नाहीत. चित्रपटात एक गंभीर नाट्यता खूप हुशारीने दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटात असलेल्या कमतरता नक्कीच भरून निघतात.
चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे अतिशय उठावदार आणि गंभीरता टिकवून ठेवणारे आहे. या चित्रपटात मांडलेल्या मुद्द्यामुळे हा चित्रपट अधिक प्रभाव पाडतो. काही महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे पिंक समाजात असलेले स्त्रीचे स्थान यावर योग्य भाष्य करतो. यामुळेच हा चित्रपट नक्कीच पाहावा.

Web Title: Dark pink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.