...त्यादिवशी आमीर खानमुळे माझा इगो दुखावला होता - विद्या बालन
By Admin | Published: April 6, 2017 09:44 AM2017-04-06T09:44:41+5:302017-04-06T09:48:03+5:30
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानमुळे एकदा आपला इगो दुखावला गेल्याची कबुली अभिनेत्री विद्या बालनने दिली आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानमुळे एकदा आपला इगो दुखावला गेल्याची कबुली अभिनेत्री विद्या बालनने दिली आहे. अभिनेत्री विद्या बालन सध्या आगामी चित्रपट "बेगम खान"च्या प्रमोशनात व्यस्त आहे. यावेळी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने हा खुलासा केला आहे. "आमीर खान समोर आल्यानंतर मीडियाने एका झटक्यात माझ्याकडे दुर्लक्ष केलं होतं, आणि ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही", असं विद्या बालनने सांगितलं आहे.
विद्याने हा संपुर्ण किस्सा सांगितला आहे. "एकदा मी कोणाच्या तरी अंत्यविधीसाठी गेली होती. मीडियाही त्याठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी तिथे उपस्थित असणारी मी एकमेव अभिनेत्री असल्याने फोटोग्राफर माझे फोटो काढत होते. मी लोकांशी बोलत होती. थोड्या वेळाने आमीर खान त्याठिकाणी पोहोचला आणि एकच गोंधळ सुरु झाला. जो मीडिया माझ्यासमोर होता त्याने मला धक्का देऊन आमीर खानकडे धाव घेतली. यामुळे मला खूप मोठा झटका बसला. आपली काहीच किंमत नाही का ? असा प्रश्न मला पडला. आमीर खान आल्यानंतर मीडियाने माझ्याकडे दुर्लक्ष केलं ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही", असं विद्या बालनने सांगितलं आहे.
विद्याने पुढे सांगितलं आहे की, "आपल्यासोबत झालं ते मीडियाने जाणुनबुजून केलं नसल्याची जाणीव मला नंतर झाली. ते आपलं काम करत होते. आमीर खान माझ्यापेक्षा जास्त मोठा आणि यशस्वी अभिनेता आहे, त्यामुळे मीडियाने त्याच्याकडे जाणं हे साहजिक आहे. पण ती घटना मी कधीच विसरली नाही".
विद्या बालनने सांगितल्याप्रमाणे "आयुष्यात जेव्हा कधी ती निराश होते तेव्ही मी कुटुंबासोबच चर्चा करते. जसं की चित्रपट न चालल्याने येणारी निराशा, मानसिक तसंच शारिरीक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास येणारी निराशा कुटुंबासोबत वाटून घेते. आधी मी आपल्या आई, वडिल आणि बहिणीशी बोलायची आता सिद्धार्थशी बोलते".
"मला जर खूप निराश वाटू लागलं तर मी माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करते. त्यांच्यासमोर माझं म्हणणं मांडते. यामुळे त्याचे दुष्परिणाम कमी होतात. जोपर्यंत माझ्या डोक्यातून ती गोष्ट पुर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत मी ती गोष्ट घरी सांगत असते. माझं कुटुंब माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतं, आणि शेवटी असं काहीतरी सांगतं ज्यामुळे मला दिलासा मिळतो", असंही विद्या बालन सांगते.
विद्या बालनचा आगामी चित्रपट "बेगम जान" भारत - पाकिस्तान फाळणीच्या काळातील गोष्ट आहे. ही कथा एका कुंटणखान्याची आहे जो भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषेवर आहे. विद्या बालन या कुंटणखान्याची मालकीण "बेगम जान"च्या मुख्य भूमिकेत आहे. आपला कुंटणखाना वाचवण्यासाठी त्यांचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. श्रीजीत मुखर्जी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 14 एप्रिलला चित्रपट रिलीज होणार आहे.