De Dhakka 2 Trailer: 'दे धक्का 2' च्या ट्रेलरमध्ये गुवाहाटीची झलक, 5 ऑगस्टला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:57 PM2022-07-21T13:57:38+5:302022-07-21T14:02:27+5:30

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदारांसह ते सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते.

De Dhakka 2 Trailer: A glimpse of Guwahati shivsena leader shahaji bapu patil in the trailer of 'De Dhakka 2', to be released on August 5 | De Dhakka 2 Trailer: 'दे धक्का 2' च्या ट्रेलरमध्ये गुवाहाटीची झलक, 5 ऑगस्टला होणार रिलीज

De Dhakka 2 Trailer: 'दे धक्का 2' च्या ट्रेलरमध्ये गुवाहाटीची झलक, 5 ऑगस्टला होणार रिलीज

googlenewsNext

मुंबई - ‘दे धक्का’ (De Dhakka ) हा सिनेमा 2008 साली प्रदर्शित झाला होता आणि या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. कोल्हापुरातील गावाकडच्या एका क्रेझी कुटुंबाची कथा बघताना प्रेक्षक भान विसरले होते. ‘दे धक्का’ला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची अर्थात ‘दे धक्का 2’ची (De Dhakka 2) चर्चा सुरू झाली. आता ‘दे धक्का 2’ प्रदर्शनासाठी सज्ज असून येत्या 5 ऑगस्टला हा चित्रपट तुमच्या आमच्या भेटीस येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटात राज्यातील राजकारणात भूकंप झाल्यानंतर अलिकडेच प्रसिद्ध झालेला डायलॉगची झलकही तुम्हाला ऐकायला मिळेल. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदारांसह ते सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. गुवाहाटीतील रेडीसन ब्लू या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांचा मुक्काम होता. या आमदारांपैकी एक असलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक ऑडिओ रेकॉर्डिंगचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये, ते आपल्या माणदेशी भाषेत एका कार्यकर्त्याला संवाद साधत होते. त्यावेळी, आम्ही सध्या गुवाहाटीत आहे, काय झाडी... काय डोंगार... काय हाटील... ओक्केमधी असं त्यांनी सुरुवातीला म्हटलं. आमदार पाटील यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या डायलॉगवर मिम्स आणि गाणंही बनलं होतं. आता, दे धक्का 2 चित्रपटातही या डायलॉगची झलक पाहायला मिळणार आहे. कारण, चित्रपटाचा अफलातून ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्यामध्ये, हा डायलॉग ऐकायला मिळतो. 

‘दे धक्का 2’मध्ये सुद्धा मकरंद जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या जुन्या धमाल अंदाजात पुन्हा भेटीला येणार आहेत. अर्थात यावेळी जरा वेगळा ट्विस्ट आहे. चित्रपटाची कथा दूर लंडनमध्ये घडतेय. त्यामुळे, लंडमधील हाटेलमध्ये पोहोचताच, मकरंद जाधवचे चित्रपटातील वडिल म्हणजेच शिवाजी साटम यांच्या तोंडून, त्यांच्याच आवाजात हा डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळेल. 

काय आहे चित्रपटाची कथा

लंडनमध्ये भारतीय अ‍ॅम्बिसीडर दरवर्षी एका भारतीय उद्योगपतीचा सत्कार करतात आणि यावर्षीचा मान मकरंदला मिळतो. मग काय, अतरंगी जाधव कुटुंब राणीच्या देशात पोहोचतं. आता राणीच्या देशात आल्यावर इंग्निश तर बोलता यायला हवंच ना. इंग्लिश बोलताना सिद्धूचं अडखळणं, शिवाजी साटम यांचं पाण्यासारखं दारू पिणं या सगळ्या गोष्टी गंमत आणतात.  मराठी माणूस म्हणून हिणवणाºया गोºयांना जाधव फॅमिली दरडावून एक वाक्य दरडावून सांगते. ते म्हणजे, मराठी माणसाला कधी कमी लेखायचं नाय...!   जाधव कुटुंबिय राणीच्या देशात मज्जा मस्तीच्या मूडमध्ये असताना त्यांच्यावर एक नवं संकट   कोसळतं.  आता या संकटातून जाधव फॅमिली कशी बाहेर येते आणि संकटाला दे धक्का म्हणत कशी पुढे जाते ते चित्रपटात दिसणार आहे.

‘दे धक्का’मध्ये धनाजीने आणलेली टमटम लक्षवेधी ठरली होती. यावेळी पण हे कुटुंबीय अशाच गाडीतून फिरताना दिसणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. एकूणच मकरंद जाधव आणि त्याची बायको सुमती, मुलगी सायली, मुलगा किस्ना, अतरंगी जावई धनाजी, हेमल्या आणि तात्यांची धम्माल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर सुद्धा सिनेमात एका भूमिकेत दिसून येणार आहेत.सध्या ‘दे धक्का 2’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 
 

Web Title: De Dhakka 2 Trailer: A glimpse of Guwahati shivsena leader shahaji bapu patil in the trailer of 'De Dhakka 2', to be released on August 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.