प्रतिभावंत गायक मा.कुमार गंधर्व यांची पुण्यतिथी

By Admin | Published: January 12, 2017 09:06 AM2017-01-12T09:06:14+5:302017-01-12T09:06:14+5:30

आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने रसिकांवर गारूड करणारे विख्यात गायक मा.कुमार गंधर्व यांची आज (१२ जानेवारी) पुण्यतिथी.

Death anniversary of talented singer M. Kumar Gandharva | प्रतिभावंत गायक मा.कुमार गंधर्व यांची पुण्यतिथी

प्रतिभावंत गायक मा.कुमार गंधर्व यांची पुण्यतिथी

googlenewsNext
>संजीव वेलणकर
पुणे, दि. १२ - आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने रसिकांवर गारूड करणारे विख्यात गायक मा.कुमार गंधर्व यांची आज (१२ जानेवारी) पुण्यतिथी. 
८ एप्रिल १९२४ साली बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. १९३० आणि १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच कुमारजींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला.  एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमारजींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता. १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमारजींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या. कुमारजी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन , नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमारजींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमारजींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे.  कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. भारत सरकारने १९९० साली कुमारजींना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.  १२ जानेवारी १९९२ रोजी त्यांचे निधन झाले.
लोकमत समूहातर्फे मा.कुमार गंधर्व यांना आदरांजली.
 
 
संदर्भ :- विकिपीडिया

Web Title: Death anniversary of talented singer M. Kumar Gandharva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.