वाद आणि ‘खान’

By Admin | Published: June 25, 2016 06:49 PM2016-06-25T18:49:46+5:302016-06-25T18:49:46+5:30

राजकारणी असो वा सेलिब्रिटी रातोरात जर फेमस व्हायचे असेल तर वादग्रस्त वक्तव्य हा त्यांना शंभर टक्के सक्सेस फॉर्म्युला वाटतो.

Debate and 'Khan' | वाद आणि ‘खान’

वाद आणि ‘खान’

googlenewsNext
>सतीश डोंगरे
राजकारणी असो वा सेलिब्रिटी रातोरात जर फेमस व्हायचे असेल तर वादग्रस्त  वक्तव्य हा त्यांना शंभर टक्के सक्सेस फॉर्म्युला वाटतो. प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही वादग्रस्त वक्तव्य करून कॉन्ट्रव्हर्सी निर्माण करणारे खान त्रिकूट त्याचीच उदाहरणे आहेत. आता हेच बघा ना, ‘सुल्तान’ या चित्रपटात पहेलवानाची भूमिका साकारण्याच्या अनुभवाची तुलना थेट बलात्कारपीडित महिलेशी करून सलमानने एकप्रकारे स्वत:हूनच वाद ओढवून घेतला आहे. याआधी किंग खान शाहरुख आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर यांनी देखील वेळोवेळी वादग्र्रस्त वक्तव्य करून याबाबतीतही एकमेकांशी स्पर्धा केली आहे. त्याचाच हा आढावा...
 
सलमान खान
‘अर्जुन रनावत नाम है मेरा, मैं मौत को तकिया और कफन को चादर बनाकर ओढता हूॅँ!’ या गर्व चित्रपटातील डायलॉगप्रमाणेच काहीसा दबंग स्टार सलमान खान वास्तविक जीवनात वावरतो. कारण एकही असे वर्ष नाही, ज्यामध्ये वादग्रस्त पद्धतीने तो चर्चेत आला नसेल. वास्तविक सलमान खान प्रसिद्धी व यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. त्याचे यशस्वी करिअर पाहता डायरेक्टर मंडळी कुठलाही विचार न करता केवळ सलमान या ब्रॅण्डवर कोट्यवधी रुपये उधळतात. सद्यस्थितीत सलमान इंडस्ट्रीमधील नंबर एकचा सुपरस्टार आहे. मात्र  सुपरस्टार होण्याबरोबरच त्याची नकारात्मक छबी देखील त्याच्या नावाशी जोडली गेली आहे. मुळात सलमान आणि वाद यांचे नाते १९९८ मध्ये जोडले गेले. जे अजूनपर्यंत कायम आहे. त्याच्यावर केवळ बेकायदेशीरपणे काळविटाची शिकार केल्याचाच आरोप नाही तर नशेत बेधुंदपणे गाडी चालवून फुटपाथवरील लोकांना चिरडणे, पार्ट्यांमध्ये धिंगाणा घालणे, शिविगाळ करणे आदी प्रकारचेही आरोप वेळोवेळी लावले गेले. मुळात जेव्हा सलमानला काळविट शिकार प्रकरणात जेलची वारी करावी लागली, तेंव्हाच त्याच्यावर ‘बॉलिवूडचा बॅड बॉय’ असा ठपका ठेवला गेला. तेव्हापासून सलमान अन् वाद हे जणू काही एकमेकांचा पिच्छाच पुरवत आहेत. कारण काळविट शिकार प्रकरण शांत होत नाही, तोच सलमानवर त्याची तेव्हांची गर्लफ्रेंड ऐश्वर्या रॉयला मारपीट केल्याचा आरोप केला गेला. यावेळी वडिल सलीम खान यांनी त्याची बाजु सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फार काही उपयोग झाला नाही. कारण पुढे २००२ मध्ये त्याच्यावर नशेत गाडी चालवून फुटपाथवरील पाच लोकांना चिरडल्याचा आरोप लावला गेला. या प्रकरणाची धग कायम असतानाच २००३ मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. परंतु त्याच्या या निर्माण होणाºया बॅड इमेजचा चित्रपटांवर अजिबातही परिणाम झाला नाही. कारण अशातही त्याचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम करीत होते. त्याचबरोबर वाद-विवादाच सिलसिलाही सुरूच होता. २००८ मध्ये तर कॅटरिनाच्या बर्थ डे पार्टीत शाहरुख अन् सलमान हे आपआपसात भिडल्याचे समोर आले होते. अशा एक ना अनेक प्रकरणात सलमान गुंतलेला असल्याने देशातल्या विविध न्यायालयांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. यातील काही घटले निकाली निघालेत तर काहींचा निकाल लागणे बाकी आहे.
 
शाहरुख खान 
शाहरुख खानने इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे, यात काही दुमत नाही. मात्र तो देखील वेळोवेळी वादात अडकला आहे.  यामधील सर्वात मोठा वाद म्हणजे सलमान, आमीरसोबत घेतलेली दुश्मनी. सध्या सलमानसोबतच्या संबंधांमध्ये जरी काहीशी सुधारणा आली असली तरी पूर्वी हे दोघेही एकमेकांचे नाव घेणे पसंत करीत नव्हते. वास्तविक शाहरुख इंडस्ट्रीपेक्षा राजकारण्यांच्याच अधिक रडारवर राहिला आहे. अमरसिंग यांच्यासोबतचा त्याचा वाद चांगलाच गाजला होता. तेव्हा शाहरुखने ‘आपकी आॅँखो में मुझे दरिंदगी नजर आती है’ अशा शब्दांत अमरसिंग यांना सुनावले होते. अलीकडेच त्याने देशातील असहिष्णुतेवर केलेल्या वक्तव्यामुळे तो चौफेर टीकेचा धनी ठरला होता. त्यातच पाकिस्तानी आंतकवादी हाफीज सईद याने जाहीरपणे शाहरुखला पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिल्याने राजकीय पक्ष अन् शाहरुख असा सामना रंगला होता. भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी शाहरुखची तुलना हाफिज सईद याच्याशी केली होती. तर कैलास विजयवर्गीय यांनी ‘शाहरुखचे मन भारतात नव्हे तर पाकिस्तानात रमते’ असे म्हटले होते. शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट देखील याच कारणाने वादात अडकला  होता. तसेच सरोगसी पद्धतीने जन्मणाºया तिसºया मुलाचे गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी देखील शाहरुख वादात अडकला होता. आयपीएल दरम्यान सुरक्षा रक्षकाला केलेल्या शिवीगाळप्रकरणी देखील शाहरुख बºयाच काळ वादग्रस्त ठरला होता. तसेच फराह खानचा पती शिरीष कुंदूर याच्यावर हात उचलल्याप्रकरणी व रॅप गायक हनी सिंग याच्या कानशिलात मारल्याप्रकरणी देखील शाहरुखवर चौफेर टीका करण्यात आली. अलीकडेच रिलीज झालेल्या शाहरुखच्या ‘फॅन’ या चित्रपटाची कथा चोरीची असल्याचा आरोप केला गेल्यानेही तो वादात सापडला होता. 
 
आमीर खान 
चित्रपट साकारण्याबाबत अतिशय चोखंदळ वृत्ती बाळगण्याच्या स्वभावामुळे आमीर खान याला मिस्टर परफेक्टनिस्ट ही बिरूदावली लावली जाते. एका वर्षात एक चित्रपट या फॉर्म्युल्यानुसार बॉक्स आॅफिसवर धूम करणाºया आमीरलाही त्याच्या वक्तव्यांमुळे चौफेर टीका सहन करावी लागली आहे. असहिष्णुतेच्या मुद्यावर तर आमीर विरुद्ध सरकार असा जणू सामनाच रंगला होता. आमीरने एका जाहीर कार्यक्रमात म्हटले होते की, ‘पत्नी किरणने मला देशातील सद्यस्थिती पाहता मुलाच्या सुरक्षिततेसाठी देश सोडायला हवा का असा प्रश्न विचारला होता’. त्याच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशातील वातावरणच ढवळून निघाले होते. सोशल मीडियावर तर आमीर चर्चेचा विषय ठरला होता. या वादामुळे त्याला ‘अतुल्य भारत’ कॅम्पेनच्या ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर पदावरून देखील हटविण्यात आले. त्याचबरोबर मेगा रोड सेफ्टी कॅम्पेनमधून देखील त्याला हटविले. बºयाचशा मोठ्या व्यावसायिक कंपन्यांनी त्याचा करार संपुष्टात आणला. तसेच कंगना रणावत आणि हृतिक रोशन यांच्या सुरू असलेल्या कायदेशीर वादात आमीर कंगणाला पाठिंबा देत असल्याचे समोर आल्यानंतरही तो चर्चेत आला होता. मात्र वाद चिघळण्याच्या अगोदरच त्याने याबाबतचा खुलासा करीत माझ्या काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. ‘पीके’ या सुपरहिट चित्रपटादरम्यान देखील आमीरवर टीका करण्यात आली. या चित्रपटामधून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याचबरोबर शाहरुखसोबतचा त्याचा वाद नेहमीच चर्चेत राहिला आहे. कारण संधी मिळेल तेव्हा या दोघाही सुपरस्टार्सनी एकमेकांवर टीका केली आहे. 

Web Title: Debate and 'Khan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.