दीपिकाच्या JNU आंदोलनातील सहभागामुळे 'छपाक' वर परिणाम झाला, मेघना गुलजार स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 08:54 AM2023-11-28T08:54:52+5:302023-11-28T08:56:18+5:30
फिल्म रिलीज होण्याच्या तीन दिवस आधीच दीपिका JNU मध्ये गेल्याचा वाद चर्चेत होता.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) आजपर्यंत तिच्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या. कधी कॉकटेलची व्हेरॉनिका तर कधी बाजीरावची मस्तानी तर कधी पिकू. दीपिकाने अभिनयाच्या जोरावर यश मिळवलं. 2020 साली दीपिकाचा 'छपाक' हा सिनेमा रिलीज झाला होता. मेघना गुलजार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 'छपाक' सिनेमा बॉक्सऑफिसलवर फारसा चालला नाही. तेव्हा JNU मध्ये होत असलेल्या आंदोलनात दीपिका सहभागी झाल्यानेच सिनेमावर परिणाम झाल्याचं मेघना गुलजार यांनी मान्य केलं.
मेघना गुलजार नुकतंच एका मुलाखतीत म्हणाल्या, 'फिल्म रिलीज होण्याच्या तीन दिवस आधीच दीपिका JNU मध्ये गेल्याचा वाद चर्चेत होता. हो, याचा सिनेमावर परिणाम झाला. कारण ज्या विषयाला मी सिनेमातून पुढे आणत होते तो अॅसिड हल्ल्याचा विषय सोडून भलताच वाद सुरु झाला. यामुळे नक्कीच याचा सिनेमावर परिणाम झाला. हे मान्य केलंच पाहिजे.'
7 जानेवारी 2020 रोजी जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयमध्ये एका आंदोलनात दीपिकाही काही वेळासाठी सहभागी झाली होती. मात्र तिथे एकही शब्द न बोलता ती निघूनही गेली. JNU च्या आंदोलनाने तेव्हा समाजात खळबळ उडाली होती. दीपिकाच्या हजेरीनंतर #BoycottChhapaak आणि #BlockDeepika असे हॅशटॅग ट्रेंड होत होते. याचा सिनेमावर वाईट परिणाम झाला. अॅसिड हल्ल्यासारख्या सामाजिक विषयावर हा सिनेमा बेतलेला होता मात्र या कारणामुळे तो फ्लॉप ठरला.