‘भारतामध्ये हिंदूंमुळे लोकशाही टिकून, पण आज…’ जावेद अख्तर यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 01:01 PM2023-11-10T13:01:56+5:302023-11-10T13:05:01+5:30
Javed Akhtar: मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत प्रख्यात लेखक, कवी जावेद अख्तर यांनी मांडलेल्या मतांची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत प्रख्यात लेखक, कवी जावेद अख्तर यांनी मांडलेल्या मतांची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. रामायण भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. सीतारामाच्या भूमीवर जन्माला आल्याचा आम्हाला गर्व आहे, असं जावेद अख्तर म्हणाले होते. त्याबरोबरच भारतातीलहिंदू संस्कृती ही सहिष्णू असल्याने या देशात लोकशाही टिकून आहे, असं विधानही जावेद अख्तर यांनी केलं.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जावेद अख्तर म्हणाले की, भारतामध्ये जर लोकशाही टिकून असेल तर त्याचं कारण हे हिंदू संस्कृती आहे. आम्हीच योग्य आहोत, बाकीचे चुकीचे आहेत, हा दावा करणं हे हिंदू संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही. मात्र आता असहिष्णुता वाढत आहे. पण तरीही हिंदू संस्कृती ही सहिष्णू असल्याने भारतातील लोकशाही टिकून आहे.
यावेळी जावेद अख्तर यांनी श्रीराम आणि रामायणाबाबतही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की,'रामायण भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. सीतारामाच्या भूमीवर जन्माला आल्याचा आम्हाला गर्व आहे. प्रभू श्रीराम आणि सीता केवळ हिंदू देव देवता नाही. ही भारतीय संस्कृती आहे. मी नास्तिक असलो तरी मी प्रभू श्रीराम आणि सीतेला आपल्या देशाची संपत्ती मानतो म्हणूनच आज मी इथे आहे. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो तेव्हा राम आणि सीताच आठवतात.जय सियाराम.'