नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 01:40 PM2020-08-12T13:40:33+5:302020-08-12T13:41:53+5:30

आशुतोषच्या मृत्यूनंतर आता त्याचे कुटुंब हळूहळू या धक्क्यातून सावरत आहेत. मंगळवारी आशुतोषचा वाढदिवस झाला

Depression has no face, there is a lot of sorrow but ..; Emotional post of actor Ashutosh Bhakre mother | नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देनैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजारमेंदू हा सर्वात जास्तं काम करतो मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पहिजेकाळजी आणि आधाराची गरज मानसिक त्रासात असणार्‍या व्यक्तीला असते.

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने २९ जुलै रोजी नांदेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ३२ वर्षांच्या आशुतोषच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला होता. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. डिप्रेशनमुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. आशुतोषच्या अकाली जाण्याने त्याची पत्नी मयुरी आणि कुटुंबीय मोठा धक्का बसला.

आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असे त्यांच्या जवळचे मित्र सांगत होते. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते. सध्या मयुरीही नांदेडमध्येच आहे. त्या दोघांमध्ये कोणतेही वाद नव्हते आणि आर्थिक चणचणदेखील नव्हती तरीदेखील आशुतोषने आत्महत्या का केली, असा प्रश्न त्याच्या जवळच्या व्यक्तींना पडला होता.

आशुतोषच्या मृत्यूनंतर आता त्याचे कुटुंब हळूहळू या धक्क्यातून सावरत आहेत. मंगळवारी आशुतोषचा वाढदिवस झाला, त्यानिमित्ताने आशुतोषची आई अनुराधा भाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित मानसिक तणावाकडे गंभीरतेने पाहा असा सल्ला लोकांना दिला आहे. काय लिहिलंय आशुतोष भाकरे यांच्या आईने फेसबुक पोस्टमध्ये वाचा

११ ऑगस्ट, आशुचा ३२ वा वाढदिवस, आज आशुला जाऊन तेरा दिवस झालेत. गेल्या तेरा दिवसात त्याच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही क्षण गेला नाही. त्याचे बालपण, शाळा, कॉलेज, मॉडेलिंग व पिक्चर आणि बिझनेससाठी मुंबईला जाणे, लग्न, लग्नानंतरची साडेचार वर्ष हे सारे डोळ्यासमोरुन तरळून जाते. त्यातल्या त्यात तो नैराश्यात (Depression) गेल्या नंतर सगळ्यांनी त्याला त्यातून बाहेर काढणेसाठी केलेले प्रयत्न आठवतात. मी ,मयुरी, त्याचे वडील डॉ. भाकरे, त्याचा अमेरिकेतील लहान भाऊ अभिलाष, आजी, मामा , मामी, मयुरीचे आई व वडील मयुरीचे दोन्ही भाऊ-वहिन्या, मयुरीचे व आशु चे मित्र व मैत्रिणी , नांदेड व मुंबई येथील मनोविकार तज्ञ डॉक्टर्स ह्या सर्वांनी आपापल्या परीने त्याला नैराश्यातून बाहेर काढणेचे खूप प्रयत्न केलेत. सगळे खूप सपोर्टीव होते. मयुरी कायम मला म्हणायची मम्मी आपण आशूला यातून बाहेर काढूच , काळजी करू नका. आशु योग्य प्रतिसाद ही देत होता. त्या साठी मयुरीने मागील दोन वर्षात तिला आलेल्या खूप सिरियलस नाकारल्यात कारण सिरियल म्हटली म्हणजे दररोज सकाळी सहा पासून रात्री दहा पर्यंत व्यस्त रहाणे. केवळ आशुच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादे नाटक व सिनेमा स्वीकारला. ह्या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रिण, मार्गदर्शक, आणि विशेष म्हणजे त्याची आई होवून लहान बाळा प्रमाणे काळजी घेतली.

लॉकडाऊन मध्ये २५ मार्च पासून ते ३० जून ला मयुरी व आशु नांदेडला येईपर्यंत देशमुख परिवारातील आशु व मयुरीसह नऊ सदस्य एकत्रित राहत. रात्री जेवणानंतर करमणुकीसाठी पत्ते, ऊनो, लुडो, डम्ब शेराज, कॅरम, ई. असा दिनक्रम होता. आशु व मयुरी स्वयंपाक घरात विविध प्रयोग करत. ह्या काळात मयुरीचे सर्व व्हिडिओजचे शूटींग आशुनेच केले. मयुरी त्याचे कडून त्याच्या कलाने प्राणायम, मेडिटेशन करुन घेत असे. ३० जूनला नांदेड ला मयुरी व आशु आले तेव्हा आशुने स्वताने पाचशे किलोमीटर गाडी चालविली. आशु व मयुरी दोघे नांदेडला आल्यावर देखील स्वयंपाक घरात वेगवेगळे प्रयोग, करमणुकीसाठी पत्ते ,लुडो ,कॅरम. तसेच चित्रपटसृष्टीशी संबधीत ऑनलाईन क्लासेस, प्राणायम, मेडिटेशन ई. दिनचर्या सुरू होतीच. तो बऱ्यापैकी रिकव्हर होत होता. पत्त्यांच्या जजमेंट ह्या गेम मध्ये तो ८०% वेळा जिंकायचा. तो असे काही करेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण आम्हा सर्वांची नजर चुकवून तो गेला.

आमचा मुलगा म्हणून मी व डॉक्टर भाकरेंनी आशुची सर्व काळजी घेतलीच पण आशुच्या सासू सासर्यांनी ही तेवढीच काळजी घेतली. मयुरीच्या आई हेमाताईंनी आशुला स्वताच्या मुलाप्रमाणे जपले. त्याचे सासरे देशमुख साहेब यांचे आग्रहाखातर आशु , मी, डॉक्टर भाकरे साहेब व देशमुख साहेब असे आम्ही चौघांनी डिसेंबर २०१९ मध्ये शेगाव येथे मानस योग साधनेचे सात दिवसीय शिबीर केले. तेथे व तद् नंतर ही आशु मध्ये फरक जाणवला.

सर्वांनी सर्व प्रयत्न केलेत, पण देवाच्या मनात काही वेगळेच होते.

आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर रितीरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावे असे सर्व नातेवाईक यांचे म्हणणे प्रमाणे ठरले. घाटावरून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून सर्व नातेवाईक परतले नंतर सर्वांसमोर मयुरी ने तिच्या आई वडिलांना सांगितले की रुढीपरंपरेनुसार मी तुमचे बरोबर यायला पाहिजे, पण इथे मम्मी व पप्पा एकटेच पडतील, अभिलाष देखील दूर अमेरिकेत आहे, आता त्यांना माझी गरज जास्त आहे त्यामुळे मी त्यांचे जवळ नांदेड येथेच थांबते. मी तुमचे कडे येतांना त्यांना दहा पंधरा दिवसांसाठी घेवून येते. केवढी ही प्रगल्भता ईतक्या कमी वयात ह्या माझ्या मुलीत ( मला दोन्ही मुलंच असलेने मयुरीला मी कधीच सून मानले नाही. ती आमची सून नसून मुलगीच आहे हे मला तेव्हा प्रकर्षांने जाणवले.

परवा मी मयुरी माझ्या लहान मुलाला फोन वर बोलतांना ऐकलं, ती त्याला समजावताना म्हणाली आम्ही सर्व इथे आहोत, तू तिकडे अमेरिकेत एकटा आहेस, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि काळजी घे. इतके सामंजस्य कुठून येते ह्याचे मला आश्चर्य वाटले.

आज आशु चा वाढदिवस, पण माझी अतोनात इच्छा आहे की जास्तीतजास्त लोकांनी डिप्रेशन ह्या गंभीर आजारावर गांभीर्याने विचार करावा म्हणुन मी लिहीत आहे. आई चे दुःख तर खूप आहे पण आम्ही सर्वांनी आणि खास करून मयुरी नी केलेल्या प्रयत्नांनी आशु खुप बरा झालेला , पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आशु ला मदत करण्यासाठी इतके लोक होते त्याचे वडील स्वता अेम. अेस.डॉक्टर , पत्नी , सासू-सासरे उच्च शिक्षित , सर्व नातेवाईक , मित्र-मैत्रिणी समंजस, सपोर्टीव पण आम्हाला न कळू देता आम्हाला सोडून गेला.

आजच्या स्पर्धेच्या युगात नैराश्यग्रस्तांची (Depression) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या कुटुंबात ही अशी व्यक्ती असू शकते. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की अशा व्यक्ती कडे दुर्लक्ष करु नका. त्याला बोलतं करा, त्याला सपोर्ट करा आणि मनोविकार तज्ञांच्या ट्रीटमेंट साठी प्रोत्साहित करा.

मेंदू हा सर्वात जास्तं काम करतो मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पहिजे. आपण कॅन्सर किंवा हृदय विकार असलेल्या व्यक्तींकडे ज्या प्रेमाने आपुलकीने हात देतो, डॉक्टरकडे नेतो तितकीच काळजी आणि आधाराची गरज मानसिक त्रासात असणार्‍या व्यक्तीला असते. त्याला त्याच्यातून बाहेर काढणेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि समजून घ्या. नैराश्याला चेहरा नसतो, नाहीतर सर्वांना हसवणारा, नेहमी मदत करणारा आशु असं करूच नसता शकला. ह्या विषयावर गांभीर्याने विचार आणि चर्चा केली पाहिजे तरच आपण अशा नैराश्याच्या रुग्णांना मदत करू शकू. नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार , त्याकडे दुर्लक्ष करु नका .एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या, रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. ह्या रुग्णांकडे सकारत्मकतेने पहा हीच एका आईची विनंती.

सौ. अनुराधा गोविंदराव भाकरे

Web Title: Depression has no face, there is a lot of sorrow but ..; Emotional post of actor Ashutosh Bhakre mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.