नातवाचा डेब्यू अन् आजोबाचे ट्रोलिंग...! राजवीरसाठी धर्मेन्द्र यांनी मागितले आशीर्वाद, लोक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:40 PM2021-03-31T16:40:18+5:302021-03-31T16:40:46+5:30
नातवाचा डेब्यू होणार म्हटल्यावर, साहजिकच आजोबा खूश्श झालेत. याच आनंदात धर्मेन्द्र यांनी राजवीरसाठी आशीर्वाद मागितले. पण...
बॉलिवूडवर गेल्या पाच दशकांपासून अधिराज्य गाजवलेल्या देओल कुटुंबातील आणखी एक सदस्य रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, अभिनेते धर्मेन्द्र यांचा नातू आणि सनी देओलचा लहान मुलगा राजवीर देओल बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. नातवाचा डेब्यू होणार म्हटल्यावर, साहजिकच आजोबा खूश्श झालेत. याच आनंदात त्यांनी राजवीरसाठी आशीर्वाद मागितले. मला दिलंत तसं प्रेम यालाही मिळू द्या..., अशी प्रार्थना त्यांनी केली. पण हे काय? या पोस्टसोबतच धर्मेन्द्र सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झालेत.
‘माझा नातू राजवीर देओल हा अवनीश बडजात्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. माझी आपल्या सर्वांना प्रार्थना आहे की, जे प्रेम तुम्ही मला दिलंत ते प्रेम तुम्ही यांनाही द्याल. गुडलक आणि गॉड ब्लेस,’ असे लिहित धर्मेन्द्र यांनी राजवीरचा फोटो शेअर केला.
धर्मेन्द्र यांची ही पोस्ट पाहून अनेकांनी राजवीरला शुभेच्छा दिल्यात. अनेकांनी त्याच्या लूक्सचे भरभरून कौतुक केले. पण अनेकांनी यावरून धर्मेन्द्र यांना ट्रोलही केले.
शेतकरी आंदोलनावर धर्मेन्द्र यांनी साधलेल्या चुप्पीवरून लोकांनी नको त्या कमेंट्स केल्यात. ‘पंजाब व पंजाबी लोक याला त्याच पद्धतीने इग्नोर करणार, ज्या पद्धतीने तुम्ही शेतकरी आंदोलनाला इग्नोर केले,’ असे एका युजरने लिहिले. शेतकरी आंदोलनाला तुम्ही पाठींबा दिला नाही, हे ध्यानात ठेवू, असे एका युजरने लिहिले. एकंदर काय तर नातवाचा डेब्यू अन् ट्रोल झालेत धर्मेन्द्र.
यापूर्वी सनी देओल यांचा मोठा मुलगा करण देओलने बॉलिवूड डेब्यू केला आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करणने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल यांनी खूप मेहनत घेतली होती. मात्र याऊपरही हा चित्रपट दणकून आपटला. आता लहान मुलगा राजवीर अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये सुरुवात करतोय. राजश्री प्रोडक्शनच्या रोमँटीक लव्ह स्टोरी असलेल्या चित्रपटात राजवीर झळकणार आहे. लोक त्याला व त्याच्या सिनेमाला किती प्रेम देतात, ते बघूच.