Dharmveer 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना भावली! 'धर्मवीर २'ची तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:43 PM2024-09-30T13:43:41+5:302024-09-30T13:44:19+5:30
वीकेंडलाही या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २.३५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशीही 'धर्मवीर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.
Dharmveer 2 : 'धर्मवीर' सिनेमानंतर याच्या सीक्वलच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. अखेर २७ सप्टेंबरला 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट' सिनेमा प्रदर्शित झाला. धर्मवीर प्रमाणेच त्याच्या सीक्वललाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या 'धर्मवीर २' सिनेमाला प्रेक्षकांनी उचलून घेतलं आहे. या सिनेमाचे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहेत. तर 'धर्मवीर २' पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. 'धर्मवीर २'चं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'धर्मवीर २' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील मराठी सिनेमांचा रेकॉर्ड मोडला. प्रदर्शित होताच सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. 'धर्मवीर २' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १.९२ कोटींचा गल्ला जमवला. २०२४ या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'धर्मवीर २' मराठी सिनेमा ठरला. त्यानंतर वीकेंडलाही या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २.३५ कोटींची कमाई केली.
तिसऱ्या दिवशीही 'धर्मवीर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. अवघ्या तीनच दिवसांत प्रसाद ओकच्या 'धर्मवीर २' सिनेमाने देशात ७.९२ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता 'धर्मवीर २' सिनेमा कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचतो का, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
'धर्मवीर २' सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रविण तरडेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात प्रसाद ओकबरोबर क्षितीश दाते, स्नेहल तरडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.