आदित्य पांचोलीने म्हटले होते, कंगना राणौत आणि मी राहायचो पती-पत्नीप्रमाणेच... पैशांसाठी केला तिने माझा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 03:09 PM2019-05-15T15:09:03+5:302019-05-15T15:13:13+5:30
आदित्यने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे हे एखाद्या पती-पत्नीसारखेच राहात होतो. आम्ही तीन वर्षं एका मित्राच्या घरात एकत्र राहायचो.
एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईच्या वर्सोवा पोलिसांना आदित्यच्या विरोधात अभिनेत्रीच्या बहिणीने केलेली ई-मेल तक्रार प्राप्त झाली आहे. संबधित तक्रारीत आदित्यवर मारहाण आणि शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. ही घटना सुमारे एका दशकापूर्वीची असल्याचे कळतेय. दरम्यान आदित्यने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मिड-डेशी बोलताना त्याने सांगितले आहे की, अभिनेत्रीच्या वकिलाने माझ्याविरोधात बलात्काराचे खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकी दिली होती. मी त्या अभिनेत्रीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
आदित्य पांचोली वादात अडकण्याची ही पहिली घटना नाहीये. अभिनेत्री कंगना राणौत आणि त्याच्यातील वादामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. आदित्य पांचोली आणि कंगना राणौत हे अनेक वर्षं नात्यात होते. आदित्य आणि कंगना हे प्रकरण अनेक वर्षांपासून गाजत आहे. आदित्यने कंगनावर हात उचचला असल्याची तक्रारदेखील तिने पोलिसांकडे दाखल केली होती. त्याच दरम्यान २००८ला आदित्यने मुंबई मिरर या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगणा आणि मी अनेक वर्षं पती-पत्नीसारखेच राहात असल्याचे म्हटले होते.
त्याने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे हे एखाद्या पती-पत्नीसारखेच होतो. अंधेरीतील यारी रोड येथे आमच्या दोघांसाठी मी घर देखील घेत होतो. आम्ही तीन वर्षं एका मित्राच्या घरात एकत्र राहात होतो. मी तिला भेटलो तेव्हा तिच्याकडे एक रुपयादेखील नव्हता. २७ जून २००४ ला मी तिला सगळ्या पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी ती आशा चंद्रा अॅक्टिंग स्कूलमधील तिच्या एका मित्रासोबत बाईकवर बसली होती. ती खूपच तणावात दिसत होती. मला पाहाताच ती आली आणि तिने मला हाय म्हटले आणि माझे नाव कंगना आहे असे तिने मला सांगितले. ती मुंबईत आल्यावर आमच्या एका कॉमन मित्राने मला तिला मदत करायला सांगितले होते. त्यामुळे तिच्याशी मी एकदम व्यवस्थित बोललो. त्यानंतर तिने मला सतत फोन करायला सुरुवात केली. ती एका छोट्याशा गावातील अतिशय साधी मुलगी असल्याने मी तिला मदत करायचे ठरवले. पण मी हळूहळू तिच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघे एकत्र राहायला लागलो. ती जो फोन वापरत होती, तो फोनदेखील माझाच होता. एका दिवशी तिने मला सांगितले की, एक मुलगा तिला फोन करून खूप सतवतो आहे. पण तिच्या मोबाईचे बिल पाहिल्यानंतर कंगनाच त्याला अनेक वेळा फोन करत असल्याचे मला कळले. तिला त्रास देत असलेल्या मुलाशी ती एवढ्या वेळ का बोलतेय हे मला तेव्हा कळलेच नव्हते.
खरे तर मला तेव्हाच कळायला पाहिजे होते की, ती मला फसवत आहे. तसेच तिने माझ्या नावाचा वापर करून तिच्या एका मानलेल्या भावाला दुबईमध्ये नोकरी मिळवून दिली. मला त्याची कल्पना देखील नव्हती. शाकालाका बूमबूम या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ती दक्षिण आफ्रिकेला गेली असता एका अभिनेत्याच्या खूप जवळ गेली होती. ती त्याला अनेक मेसेजेस देखील पाठवत असे. ते मेसेजेस मी वाचले होते. त्यानंतर आमच्यात खूप भांडणं झाली होती. त्यावेळी मी सगळ्यात पहिल्यांदा तिच्यावर हात उचलला. पण त्यावेळी आम्ही दोघांनी सगळे काही विसरून आयुष्यात पुढे जायचे ठरवले. ज्यावेळी कंगनाची बहीण रंगोलीवर अॅसिड हल्ला झाला होता, त्यावेळी देखील मी तिला सगळी काही मदत केली होती. पण माझे उपकार मानण्याचे सोडून कंगना मला शिव्या घालू लागली. माझी तुलना तिने अॅसिड हल्लेखोरासोबत केली होती. त्यामुळे मला खूप राग आला होता. मी रागातच तिच्या घरी गेलो होतो. पण मला पाहाताच ती रिक्षातून पळ काढायला लागली. मी तिला थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती निघून गेली. मी पाण्यासारखा पैसा तिच्यावर ओतला. मी तिच्या बहिणाच्या प्लास्टिक सर्जरीसाठी दहा लाख रुपये दिले होते. तसेच तिचे हॉस्पिटलचे बिल देखील मीच भरले होते. मुकेश भट्टने कंगनाला एका चित्रपटासाठी साईन केले होते. पण तिने नकार दिल्यानंतर साईनिंग अमाऊंटचे ५० हजार देखील मी परत केले. कंगनाने मला पैशांसाठी वापरले.