आहाना आणि ईशाच्या जन्माच्यावेळी धर्मेंद्र यांनी केले होते संपूर्ण हॉस्पिटल बुक, हे होते मजेदार कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:01+5:30
धर्मेंद्र यांनी असे करण्यामागे एक खास कारण होते.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी मुलगी ईशा देओलसोबत तिच्या ‘अम्मा मिया’ या आगामी पुस्तकाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहे. एक लेखिका म्हणून ईशाने हे पुस्तक लिहिण्यामागील विचार या कार्यक्रमात मांडला तसेच त्याबाबत काही किस्से देखील सांगितले. त्यानंतर तिने हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील काही मजेशीर किस्सेदेखील सांगितले.
या कार्यक्रमात ईशाने कपिल शर्माशी गप्पा मारताना सांगितले की, “पूर्वी माझे आई बाबा चित्रपटांचे शूटिंग करायचे त्यावेळी टेलिफोन हे संवाद साधण्याचे एकमेव साधन होते आणि एकदा पप्पांशी बराच वेळ गप्पा मारताना अचानक त्यांना आईच्या घोरण्याचा आवाज आला.” त्यावर हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले की, “त्या वेळी मी सतत रात्रभर शूटिंग करत होते त्यामुळे मी खूप थकले होते आणि धरमजींसोबत बोलत असताना मला झोप लागली. प्रेमाच्या गुजगोष्टी थोडा वेळ ठीक वाटतात, त्यानंतर तुम्हाला त्याचा कंटाळा येऊ लागतो. माझे हे मत धरमजींनी ऐकले तर त्यांना खूप वाईट वाटेल.”
हेमा मालिनी यांच्या मुलीच्या जन्माच्यावेळी धर्मेंद्र यांनी पूर्ण हॉस्पिटल बुक केले होते का? असे विचारले असता हेमा मालिनी यांनी सांगितले, “हो, हे खरं आहे, ईशा आणि अहाना या दोघींच्या जन्माच्या वेळी मला चाहत्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण हॉस्पिटलच माझ्या नावे बुक केले होते.”
नंतर हेमा मालिनी यांनी खुलासा केला की, त्यांनी नृत्यात कारकीर्द घडवावी अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे त्यांची आई हेमा मालिनी यांना स्वयंपाकघरात पाय देखील टाकून देत नसे. पण ईशा, अहाना लहान असताना आईने आपल्यासाठी पदार्थ बनवावेत असे त्यांना वाटायचं. त्यामुळे मग हेमा मालिनी स्वयंपाक करायला शिकल्या. ‘ब्रेड पोहा’ हा सगळ्यात पहिला पदार्थ त्या शिकल्या होत्या.