निळू फुले करायचे माळी काम, हलाखीत गेले आहे बालपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:36 AM2018-07-14T09:36:55+5:302018-07-14T09:37:44+5:30

निळू फूले यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. भाजीपाला आणि लोखंड विकणाऱ्या घरात निळू फूले यांचा जन्म झाला. त्यांची जन्मतारीख काय होती याविषयी कोणालाही ठोस माहिती नाही.

Did you know this things about Nilu phule's childhood? | निळू फुले करायचे माळी काम, हलाखीत गेले आहे बालपण

निळू फुले करायचे माळी काम, हलाखीत गेले आहे बालपण

googlenewsNext

निळू फूले यांनी जब्बार पटेल यांच्या सिंहासन, सामना या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी चार दशकाच्या कारकिर्दीत मराठी-हिंदी अशा सुमारे दीडशे चित्रपटात काम केले. सखाराम बाईंडर या त्यांच्या नाटकाची तर चांगलीच चर्चा झाली होती. निळू फुले यांचा 'बाई वाड्यावर या' या पाटलांच्या भूमिकेतील डायलॉग तर आजही लोकांच्या मनामनात राहिला आहे. निळू फूले यांनी अनेक वर्षं मराठी आणि बॉलिवूडवर राज्य केले. 13 जुलै 2009 रोजी त्यांचे निधन झाले. 
निळू फूले यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. भाजीपाला आणि लोखंड विकणाऱ्या घरात निळू फूले यांचा जन्म झाला. त्यांची जन्मतारीख काय होती याविषयी कोणालाही ठोस माहिती नाही. पण 1930-31 साली त्यांचा जन्म झाला असल्याचे म्हटले जाते. निळू फूले यांचे संपूर्ण नाव निलकांत कृष्णाजी फूले असे होते. पण चित्रपटसृष्टीत ते निळू फूले या नावानेच लोकप्रिय झाले. निळू फूले यांनी माळी म्हणून वानवडीच्या एका लष्करी महाविद्यालयात काम केले होते. तेव्हा त्यांना 80 रुपये पगार मिळत असे. त्या पगारातील दहा रुपये ते राष्ट्रसेवा दलासाठी देत असत. राष्ट्रीय सेवा दल आणि त्यांचा संबंध खूपच जुना होता. राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक वर्षं निस्वार्थपणे काम केले. त्यांनी सेवादलाच्या कलापथकाचे 1958 च्या सुमारास नेतृत्व देखील केले. त्यांचे शिक्षण केवळ मॅट्रिकपर्यंत झाले असले तरी ते प्रचंड हुशार होते. 
संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळू फूले यांनी येरा गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या नाटकात रोंगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे त्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. मग त्यांनी माळी काम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. एक गाव बारा भानगडी या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. 

Web Title: Did you know this things about Nilu phule's childhood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.