देवसेना आणि भल्लालदेवचं "हे" रोमॅन्टिक गाणं पाहिलं का ?
By Admin | Published: May 18, 2017 01:18 PM2017-05-18T13:18:27+5:302017-05-18T13:20:17+5:30
बाहुबलीसाठी भल्लालदेवला नकार देणारी देवसेना असं कसं काय करु शकते असा प्रश्न बाहुबलीच्या चाहत्यांना पडला आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - "बाहुबली 2" चित्रपटाने नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आपली यशस्वी वाटचाल अद्यापही सुरु ठेवली आहे. चित्रपट पाहण्यासाठी तिकीटबारीवर झालेली गर्दी कमी होताना दिसत नाही आहे. चित्रपटात मुख्य भूमिका निभावणा-या प्रभासपासून ते कटप्पापर्यंत सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या असून सर्वांना त्यांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. अनेकांनी तर हा चित्रपट तोंडपाठ केला आहे. प्रेक्षक चित्रपटातील भूमिकांच्या इतक्या प्रेमात पडले आहेत की, एखादी वेगळी गोष्ट समोर आली की ती त्यांच्या पचनीच पडत नाही.
सांगायचंच झालं तर काही दिवसांपुर्वी कटप्पा आणि शिवगामी यांचा रोमान्स दाखवणारी एक जाहिरात व्हायरल झाली होती. दोघेही जाहिरातीत एक शाही दांपत्याची भूमिका निभावताना दिसले होते. पण बाहुबलीच्या चाहत्यांना निष्ठावान कटप्पा आपल्या महाराणीसोबत असा रोमान्स करताना पाहणं आवडलं नाही. कटप्पा असं करुच शकत नाही अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येऊ लागल्या. बाहुबलीच्या या आभासी जगातून बाहेर पडण्यास काहीजण तयारच नाहीत.
आता असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये देवसेना आणि भल्लालदेव रोमान्स करताना दिसत आहेत. बाहुबलीसाठी भल्लालदेवला नकार देणारी देवसेना असं कसं काय करु शकते असा प्रश्न बाहुबलीच्या चाहत्यांना पडला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे.
देवसेनेशी लग्न करण्याची इच्छा असतानाही बाहुबलीसाठी त्याचा देवसेना त्याचा प्रस्ताव धुडकावून लावते. नंतर कट रचून कटप्पाच्या हाती बाहुबलीची हत्या करणारा भल्लालदेव 25 वर्ष देवसेनाला आपल्या कैदेत ठेवतो. आता असं असताना देवसेना भल्लालदेवसोबत रोमान्स कसा करेल असा विचार तुम्हीही करत असाल तर थांबा.
हे गाणं बाहुबली चित्रपटातील नाही आहे. "बाहुबली 2" च्या आधी प्रदर्शित झालेल्या रुध्रमादेवी चित्रपटातील हे गाणं आहे. या चित्रपटात अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत होती. तेलगू भाषेत तयार करण्यात आलेला हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला होता. पण बाहुबली चित्रपटाचा प्रभाव इतका आहे की सर्वांना हे बाहुबलीमधीलच गाणं असावं असं वाटत आहे. त्यात त्यांची तरी चूक काय म्हणायची.