Sonali Kulkarni : नावाचा गोंधळ! अभिनेत्री झाली त्रस्त, सोनाली कुलकर्णीबद्दल काय म्हणाली सोनाली कुलकर्णी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:13 PM2024-07-25T15:13:53+5:302024-07-25T15:14:35+5:30
सोनाली कुलकर्णी असे मराठी इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्रीची नावे आहेत.
Sonali Kulkarni : अनेक जुळी भावंडे एकसारखी दिसतात, त्यामुळे त्यांना ओळखताना गोंधळ उडताना अनेकदा आपण पाहतो. असचं एक सारखं नाव असल्यामुळेदेखील अनेकदा गैरसमज निर्माण होतो. याचा त्रास सारखी नाव असलेल्या व्यक्तींना सहन करावा लागतो. आता ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं भाष्य केलं आहे. सारखं नाव असल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
सोनाली कुलकर्णी असे मराठी इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्रीची नावे आहेत. दोघींची फक्त नावेच नाही तर आडनावसुद्धा सारखेच आहे. नावसाधर्म्य असल्यामुळे आणि दोघीही प्रसिद्ध असल्याने अनेकदा गोंधळ उडतो. नेमकी कोणती सोनाली? हा प्रश्न सर्रासपणे विचारला जातो. यावर सोनाली कुलकर्णी हिनं अमृता अरुण राव यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
सोनाली कुलकर्णी हे नाव साधर्म्य असल्याने नेमके काय अनुभव आले आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना सोनाली म्हणाली, 'मला माझ्याच नावाचा खूप त्रास होतो. इतके वर्ष काम करुनही मला सतत सांगावं लागतं की मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे. अनेक कार्यक्रमांचे मला चुकीचे फोन येतात. दुसऱ्या सोनालीला मी अनेकदा यासंदर्भात फोन केला होता'.
नावसाधर्म्याविषयी बोलताना तिने बॉलिवूडच्या कियारा अडवाणीचा संदर्भ दिला. सोनाली म्हणाली, 'कियाराचे खरे नाव आलिया अडवाणी असे आहे. सलमान खानच्या सल्ल्यानंतर तिने आपले नाव बदलून कियारा केले. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिने नावात बदल केला. त्याचे मुख्य कारण म्हणजे, बॉलिवूडमध्ये आधीच आलिया भट्ट ही अभिनेत्री होती. ज्या पद्धतीने कियाराने प्रयत्न केला तसा इथेही व्हायला हवा होतं'.
दोन्ही सोनालींचा इगो कधी क्लॅश होतो का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आला. यावर सोनाली म्हणाली, ' इगो असं नाही. पण ज्याप्रकारे कियाराने तिच्या आणि तिच्यासारखे नाव असणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केला. तसेच जर माझ्या नावाची थोडी काळजी घेतली असती तर बरे वाटले असते. गुगलवर सर्च केल्यावर आजही सोनाली कुलकर्णी शोधल्यावर वेगळे फोटो येतात. त्यामुळे मी काहीच भरीव काम केलेले नाही, असे मला वाटते. या सर्व गोष्टी त्रासदायक आहेत. हे टाळता आले असते', असं सोनालीने म्हटलं.