‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये प्रीतम, बादशहा आणि सुनिधी केला ‘लुंगी डान्स’!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:22 PM2018-07-09T13:22:00+5:302018-07-09T16:00:12+5:30
कोलकात्यातील काही तरुणांनी स्थापन केलेल्या फोक डायरीज नावाच्या एका गटाने आपले अप्रतिम संगीत सादर केल्यावर या तिन्ही परीक्षकांना एका बंगाली गाण्यावर लुंगी डान्स करण्याची विनंती केली.
‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवी उंची देणाऱ्या कार्यक्रमाच्या एका भागात सुनिधी चौहान, प्रीतम आणि बादशहा या परीक्षकांनी लुंगी नेसून प्रसिध्द लुंगी डान्स केल्याचे प्रेक्षकांना दिसेल.
कोलकात्यातील काही तरुणांनी स्थापन केलेल्या फोक डायरीज नावाच्या एका गटाने आपले अप्रतिम संगीत सादर केल्यावर या तिन्ही परीक्षकांना एका बंगाली गाण्यावर लुंगी डान्स करण्याची विनंती केली. या गाण्याच्या बॅण्डमधील स्पर्धकांनी लुंगी नेसली होती, ती नंतर परीक्षकांनाही नेसायला लावून त्यांच्याकडून त्यांनी नृत्य करविले. सेटवरील सूत्रांनी सांगितले, “फोक डायरीज या गटाचे संगीत फारच उत्तम होते. पण त्यानंतर त्यांनी या परीक्षकांना लुंगी नेसवून नृत्य करायला लावले, तो भाग अधिक मनोरंजक होता. या गटाने परीक्षकांसाठी खास लुंगी बनवून आणल्या होत्या. पण या परीक्षकांनी, अगदी सुनिधीनेही, खिलाडूपणे त्यांचा स्वीकार केला. सुनिधीला तिच्या ड्रेसवर लुंगी नेसलेली पाहणं मजेशीर होतं. त्यांच्याबरोबर प्रीतमही गायला. त्याने सांगितले की स्पर्धकांमध्ये हा वाद्यवृंद त्याचा लाडका असून त्यांच्यामुळे त्याला त्याच्या घरची- कोलकात्याची आठवण येते.”
फोक डायरीज गटातील एका प्रमुख गायकाने सांगितले, “दिल है हिंदुस्तानी कार्यक्रमात आम्ही पारंपरिक आणि आधुनिक संगीत यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे हे संगीत जगभरातील संगीतप्रेमींना आपलंसं वाटतं. आपल्या संस्कृतीत आपण ज्यांचा आदर करतो, त्यांना लुंगी भेट देण्याची प्रथा आहे. पण या परीक्षकांनी लुंगी केवळ स्वीकारलीच असं नव्हे, तर ती नेसून त्यांनी नृत्यही केलं, ज्यामुळे आम्हाला फार आनंद झाला.”