दिलखुलास राधा मंगेशकर

By Admin | Published: July 23, 2016 03:17 AM2016-07-23T03:17:24+5:302016-07-23T03:17:24+5:30

ज्या घरात साक्षात सरस्वतीचा वास आहे, संगीताचा समृद्ध वारसा ज्या घराण्याला लाभलाय, असं घराणं म्हणजे मंगेशकर घराणं.

Dilkhulas Radha Mangeshkar | दिलखुलास राधा मंगेशकर

दिलखुलास राधा मंगेशकर

googlenewsNext


ज्या घरात साक्षात सरस्वतीचा वास आहे, संगीताचा समृद्ध वारसा ज्या घराण्याला लाभलाय, असं घराणं म्हणजे मंगेशकर घराणं. या घराण्याची तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी गायिका म्हणजे राधा मंगेशकर. वडील हृदयनाथ मंगेशकर, आत्या लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर या दिग्गजांचा सहवास लाभलेली राधा आता संगीत क्षेत्रात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करतेय. मंगेशकर घराण्यातील एक सदस्य ही गोष्ट सोडल्यास राधाच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की आजवर कुणालाही माहीत नाहीत. याचविषयी जाणून घेण्यासाठी खुद्द राधा मंगेशकर हिच्याशी साधलेला हा संवाद...
मंगेशकर घराण्याला संगीताचा समृद्ध वारसा लाभलाय. अशा परिस्थितीत तू सुद्धा संगीत क्षेत्रात यावं, असा काही खास आग्रह होता का?
- घरातच संगीत असल्यामुळं वडील हृदयनाथ मंगेशकर आणि आत्या यांना परफॉर्म करताना पाहायची, तेव्हा वाटायचं की आपणही स्टेज शो करावेत. त्याबद्दल एक आकर्षण वाटायचं आणि मग त्यामुळंच मीही संगीत शिकायला सुरुवात केली. घरातून कधीही आग्रह नव्हता की हेच कर, तेच कर. मला माझं पूर्ण स्वातंत्र्य होतं. आजही माझ्यावर कोणत्याही गोष्टीचं दडपण नाही. वडील पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडूनच मी संगीत शिकले. ते खूप कडक शिस्तीचे आहेत. तरीही तितकेच कूलही आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत जुनी असली, तरी मीसुद्धा आवडीनं शिकत गेले. ते जे काही शिकवायचे ते लक्षपूर्वक आत्मसात करीत गेले. लतादीदी असो किंवा आशाताई यांनी वैयक्तिकरीत्या काही शिकवलं नाही, त्यांना बघत बघत शिकत गेले.
गाणं शिकताना घरातलं वातावरण कसं होतं. पुढे गाणं शिकल्यानंतर काही अडचणींचा सामना करावा लागला का?
- आमचं घर खूप शिस्तप्रिय आहे. त्यामुळं मी प्रामाणिकपणे आणि मन लावून सगळ्या गोष्टी आत्मसात करीत गेले. सुरुवातीला माझ्या गाण्यावर बरेच आक्षेप आणि टीकाही झाली. लहानपणी गाण्याची तितकी ताकद म्हणा किंवा क्षमता नव्हती. त्यामुळं अनेकांनी त्यावर टीका केली. मात्र त्याकडे लक्ष न देता मी रियाज करीत गेले. आजवर जे मला पटलं तेच मी केलं आणि यापुढेही तेच करीत राहणार. लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता जे आवडेल ते करायचंय.
गाणं शिकायला सुरुवात केल्यापासून ते आजवर तुला काय काय बदल जाणवले?
- जेव्हापासून गाणं शिकायला सुरुवात केली तेव्हापासून ते आजवर बरेच बदल पाहायला मिळालेत. स्ट्रगल हा कुणालाही चुकलेला नाही. तसा स्ट्रगल माझ्या जीवनातही आला. माझा सांगीतिक प्रवासही तितकाच खडतर होता. या काळात मला बऱ्याच गोष्टींचा त्यागही करावा लागला. बऱ्याच गोष्टींचा सामनाही करावा लागला. अनेकांच्या टीकेचा सामना केला, तर काहींनी नाउमेद करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यामुळं जराही खचले नाही आणि मुळात गाणं सोडलं नाही. परिणामी, गेल्या ७-८ वर्षांत मला बदल पाहायला मिळतोय. रसिकांना माझं गाणं आवडतंय आणि त्यांच्याकडून कौतुकसुद्धा होतंय.
प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात आणि स्ट्रगलच्या काळात साथ देणारे तसे कमीच असतात. मात्र तुझ्याबाबतीत या काळात तुला कुणी आधार दिला ?
- एका कलाकाराला खंबीर असणं खूप महत्त्वाचं आहे. जीवनात कायम अनेक चढ-उतार येत असतात. याच स्ट्रगलच्या काळात मला साथ लाभली ती माझे वडील, आई आणि माझ्या मैत्रिणीची. माझी आई एक चांगली अभिनेत्री होती. तिनं अनेक नाटकांत कामसुद्धा केलंय. तिचंही तितकंच मोठं नाव होतं. मात्र लग्नानंतर तिनं संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. स्वत:च्या करिअरचा तिनं कधीही विचार केला नाही. ती खूप देवभोळी आहे. देवावर तिचा प्रचंड विश्वास असून, ती आमच्यासाठी खूप काही करते. माझ्या आईप्रमाणे माझ्या जीवनात माझ्या एका मैत्रिणीचंही मोलाचं स्थान आहे. तिचं नाव आहे निशिता बावडेकर. माझ्या करिअरमध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे. तिनं मला खूप सुख दिलंय. तिची साथ नसती, तर बऱ्याच गोष्टी खूप कठीण गेल्या असत्या. ती आहे म्हणून माझं आयुष्य खूप सुंदर आहे.
संगीताशिवाय राधा सध्या आणखी काय करतेय? मोकळ्या वेळात तुला काय काय करायला आवडतं?
- सध्या मी इंडियन सायकॉलॉजी या विषयात पीएच.डी. करतेय. काही दिवसांत पीएच.डी. होईल सुद्धा. मात्र दरम्यानच्या काळात अनेकांनी मला विचारलं, की संगीतामध्ये पीएच.डी. का नाही केली? मात्र मला समजत नाही, की संगीतामध्ये पीएच.डी. कशी करणार? कारण संगीताला कोणतीही थीअरी नसते. थीअरी असेल तरी ती मी मानत नाही. कारण राग, यमन हे काय पेपरवर लिहून कळणार का? ते मुळात गाता आलं पाहिजे. गाण्याव्यतिरिक्त मला फिरायला आवडतं. आजवर मी अख्खं जग फिरलेय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता फक्त काही देश राहिलेत, जिथं मी गेले नाही. जेवढं जग फिरले त्यातून बरंच काही शिकायला मिळालंय. याशिवाय इतिहास जाणून घ्यायलाही आवडतं. मला खासकरून जुनं संगीत आवडतं. शंकर जयकिशन, मोहम्मद रफी, कुमार गंधर्व यांची गाणी आवडतात. नवीन गायकांपैकी सुनीधी चौहानचं गाणं आवडतं. याशिवाय मला लिखाणही करायला आवडतं. मात्र आजवर कधी केलेलं नाही. संधी मिळाल्यास जरूर करायला आवडेल. कारण लिहिण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. या गोष्टी मला माझ्या लिखाणातून उलगडायला आवडतील. अनेक जण सल्ला देतात, की मंगेशकर कुटुंबावर का नाही लिहीत? पण माझं कुटुंब, त्यांच्याविषयी सगळ्यांना माहिती आहे. जे जे मी जगले ते ते सगळ्यांसोबत नाही शेअर करायचंय. माझ्या घरातील दिग्गजांच्या कलेवर लिहिणारी, बोलणारी मी कुणीही नाही. कारण त्यांची कामगिरी खूप खूप मोठी आहे.
तुझ्या शोविषयी जाणून घ्यायला आवडेल?
- सध्या माझे दोन शो सुरू आहेत. ‘काहे मीरा सूर कबीरा’ आणि ‘रवींद्र संगीत.’ काहे मीरा... या शोमध्ये संतांची महती, त्यांचा काळ उलगडण्याचा प्रयत्न केलाय. त्याचे २५ शो झालेत. तर रवींद्र संगीतमध्ये टागोरांनी संगीतबद्ध केलेलं संगीत मांडलंय. हे दोन्ही शो स्क्रीप्टेड नाहीत. शो करताना जे सुचतं ते बोलते. सूत्रसंचालन आणि गाणं या माध्यमातून रसिकांशी संवाद साधते. संगीताच्या माध्यमातून संतांची महती सांगणं खूप आवडतं आणि तितकंच ते आव्हानात्मकही वाटतं.
तुला स्टेज शो करायला आवडतं की रेकॉर्डेड?
- मला स्टेज शो करायला आवडतात. लाइव्ह परफॉर्म करायला आवडतं. कारण लाइव्हमध्ये जी मजा आहे, ती रेकॉर्डेडमध्ये नाही. आजही मला स्टेजवर शो सुरू होताना खूप भीती वाटते. ही भीती असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण अतिआत्मविश्वास कधी कधी घातकही ठरू शकतो. आजच्या पिढीची विचारसरणीच मला पटत नाही. कुणावर वैयक्तिक टीका नाही, पण नव्या पिढीची विचारसरणी आणि माझी विचारसरणी मेळच होऊ शकत नाही. नव्या पिढीला माझ्या कित्येक गोष्टी आवडत नसतील. मात्र ट्रेंडपेक्षा मला तर जुन्या गोष्टी जपायला आवडतात.
यश म्हणजे तुझ्यासाठी काय आहे?
- यश मिळवणं म्हणजे फक्त पैसा, प्रसिद्धी मिळवणं इतकंच नाही. त्याला तर मी यश मानतच नाही. जी गोष्ट मला करायचीय ती मी पूर्ण केली तर ते माझ्यासाठी यश आहे. मानसिक समाधान हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पैशासाठी मी कधीच गायले नाही आणि ना तसं ध्येय आहे.

Web Title: Dilkhulas Radha Mangeshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.