ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:28 IST2025-04-19T12:28:00+5:302025-04-19T12:28:20+5:30
ब्राम्हण समाजाविरुद्ध अनुरागने जे वक्तव्य केलं त्यासाठी त्याने जाहीर माफी मागितली आहे. काय म्हणाला अनुराग? (anurag kashyap)

ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..."
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (anurag kashyap) यांनी ब्राह्मण समाजावर केलेल्या वादग्रस्त विधानावर अखेर माफी मागितली आहे. ‘फुले’ (phule movie) या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनुराग कश्यपने एका यूजरला जे उत्तर दिलं त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यामुळे अनुराग कश्यप यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक धमक्याही मिळाल्या. अनेकांनी अनुरागच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केली. परिणामी, अनुरागने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक दीर्घ पोस्ट शेअर करत माफी मागितली.
अनुरागने मागितली माफी
अनुराग कश्यपने स्पष्टपणे सांगितले की, "ही माफी त्या संपूर्ण पोस्टसाठी नाही, तर त्या एका ओळीसाठी आहे. त्या ओळीचा वेगळा संदर्भ जोडण्यात आला त्यामुळे मोठा द्वेष पसरला. माझे मत कितीही स्पष्ट असो पण त्यामुळे माझ्या मुलीच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असेल तर ते मत माझ्यासाठी महत्त्वाचं नाही."
"मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण जर माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल, तर मला माफ करा. मला शिव्या द्या, पण माझ्या कुटुंबाला कोणताही त्रास देऊ नका. तुम्हाला माझ्याकडून माफीच हवी होती, तर मी माफी मागतोय. पण शुद्ध संस्कारांची आणि धर्माची शिकवण देणाऱ्यांनी स्त्रियांचा सन्मान राखावा, इतकीच अपेक्षा आहे." अशाप्रकारे अनुरागने सोशल मीडियावर माफी मागितली.
अनुरागच्या या वक्तव्यामुळे निर्माण झाला वाद
'फुले' सिनेमाच्या पार्श्वभूमीवर अनुरागने काही दिवसांपूर्वी पोस्ट लिहिली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला. अनुरागने लिहिलेलं की, "धडक २च्या स्क्रिनिंग वेळी सेन्सॉर बोर्डने असं सांगितलं की मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केली आहे. याच आधारावर संतोष सिनेमादेखील भारतात प्रदर्शित झाला नाही. आता 'फुले' सिनेमावरुन ब्राह्मण समाजाला आक्षेप आहे. पण, भाऊ जर जाती व्यवस्थाच नाही राहिली तर ब्राह्मण कुठून आले? कोण आहात तुम्ही? तुम्हाला का त्रास होत आहे?"
"जर जाती व्यवस्थाच नसती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसते. एक तर ब्राह्मण नाहीच आहेत, कारण मोदींच्यानुसार भारतात जाती व्यवस्थाच नाहीये. की सगळे मिळून सगळ्यांना मुर्ख बनवत आहेत? भारतात जाती व्यवस्था आहे की नाही, हे तुम्ही मिळून आधी काय ते ठरवा. लोक मुर्ख नाहीत. तुम्ही ब्राह्मण आहात की तुमचे पूर्वज होते जे आता इथे नाहीत...काय ते ठरवा". यामुळे अनुरागविरुद्ध नाराजीचे सूर उमटले. पण आता अनुरागने माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.