Good News! या दिवसापासून दिशा वाकानी सुरू करणार तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 07:13 PM2019-05-11T19:13:45+5:302019-05-11T19:14:59+5:30
दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत लवकरच परतणार आहे. तिनेच हा संकेत सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना दिला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परतणार असल्याचे वृत्त मिड डेने नुकतेच दिले आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, असित मोदी सध्या इटलीला फिरायला गेलेले असून ते परत आल्यानंतर १८ मे ला दिशा या मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करणार आहे.
दिशा वाकानीने देखील सोशल मीडियाद्वारे ती मालिकेत परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर तिचा आणि या मालिकेत अंजलीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत दया विथ अंजली असे कॅप्शन लिहिले आहे. तसेच तिचा या मालिकेतील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावरून दिशा लवकरच मालिकेत परतणार असल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांकडून लावण्यात येत आहे.
आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. प्रेक्षकांची लाडकी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
दिशाच्या परतण्याबाबत असित कुमार मोदी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, दया या मालिकेत परत कधी येईल याची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. दिशा परत येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. पण त्याचसोबत आम्ही काही अभिनेत्रींशी देखील या भूमिकेबाबत चर्चा करत आहोत.