‘केदारनाथ’वर सुरू असलेल्या वादावर आली निर्मात्यांची प्रतिक्रिया, वाचा संपूर्ण बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:25 AM2018-11-13T11:25:39+5:302018-11-13T11:28:08+5:30
सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या ‘केदारनाथ’ने प्रदर्शनापूर्वीच वाद ओढवून घेतला आहे. उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजाºयांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या ‘केदारनाथ’ने प्रदर्शनापूर्वीच वाद ओढवून घेतला आहे. उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजा-यांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट हिंदुंच्या भावना दुखावणारा शिवाय लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा आहे, असा दावा या पुजा-यांनी केला आहे. गत आठवड्यात एका भाजपान नेत्यानेही हा चित्रपट लव जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा करत, यासंदर्भात सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. या चित्रपटात एका हिंदू-मुस्लिम जोडप्याचे प्रेम दाखवण्यात आले आहे आणि येथूनच या वादाची ठिणगी पडली आहे. या संपूर्ण वादावर चित्रपटाचे निर्माते रोनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
होय, काल ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये रोनी स्क्रूवाला यांनी आपल्या चित्रपटाचा जोरदार बचाव केला. ‘केदारनाथ’बद्दल आम्ही स्पष्टीकरण द्यावे, असा कुठलाही वाद आमच्यापर्यंत आलेला नाही, असे रोनी स्क्रूवाला यांनी म्हटले आहे. सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित करून चित्रपट रिलीज करणे हे आमचे काम आहे. आम्ही सगळे रचनात्मक लोक आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही सगळ्यात आधी भारतीय आहोत. आम्ही कुणाच्या भावना दुखावल्यात असे आम्हाला वाटत नाही, असे त्यांनी म्हटले. मत बनवण्याआधी चित्रपट बघा, असे आवाहनही त्यांनी केले.
अभिषेक कपूरनेही या वादावर प्रतिक्रिया दिली. आम्ही आधी टीजर रिलीज केला आणि आता ट्रेलर. टीजर व ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही, हे लोकांना कळेल, असे ते म्हणाले.
‘केदारनाथ’ या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.